1 minute reading time (253 words)

दौंड तालुक्यातील रेल्वे मार्गखालील मोऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करून लोकांना रस्ते द्या

दौंड तालुक्यातील रेल्वे मार्गखालील मोऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करून लोकांना रस्ते द्या

खासदार सुळे यांच्या रेल्वे खात्याला सूचना

पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - दौंड तालुक्यातील रेल्वे लाईनच्या खालून गेलेल्या चार ठिकाणच्या मोऱ्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. त्याचवेळी काम सुरू असल्याने पर्यायी रस्त्याचे गेट सुद्धा बंद करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांची कामे खोळंबुन पडत आहेत.ते काम तातडीने पूर्ण करावे. याशिवाय दोन ठिकाणी लवकरच उड्डाणपुलाचे काम सुरू होईल, त्याठिकाणी गेट बंद करू नये, नागरिकांना रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे प्रशासनाला दिल्या.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू दुबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत खासदार सुळे यांनी या सूचना केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संथ गतीने काम सुरू असलेल्या मोऱ्यांमध्ये बोरीपार्धी (एल.सी. नंबर १२), कडेठाण–वरवंड रोड (एल.सी. नंबर १४), कानगाव–पाटस रोड (एल.सी. नंबर १५) आणि गिरिम वायरलेस फाटा ते नानवीज ट्रेनिंग सेंटर रस्ता (एल.सी. नंबर १७) या चार मोऱ्यांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मोऱ्यांचे काम सुरू आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर पाणी साचून रहात आहे. पर्यायी रस्त्याचा वापर करावा, तर काम चालू असल्याने त्या बाजूचे गेट बंद करण्यात आले आहे. या सगळ्यामुळे स्थानिक नागरिकांचा प्रवास आणि त्यांची कामे खोळंबुन पडत आहेत. तरी या मोत्यांची कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

तालुक्यातील सहजपूर–नांदूर रस्त्यावरील उड्डाण पुलाचे काम मंजूर झाले आहे. लवकरच याठिकाणी काम सुरू होईल त्यावेळी स्थानिक नागरिकांना रस्ते पाहिजेत याकडेही लक्ष द्यायला हवे. त्यामुळे ते काम सुरु होताना येथील गेट (एल.सी.९) चालू ठेवण्यात यावे. याबरोबरच खामगाव रस्त्यावरील उड्डाण पुलाचे काम सुरू झाल्यावर येथील गेट (एल.सी.१०) चालू ठेवण्यात यावे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रस्ता उपलब्ध होऊन त्यांची कामे अडणार नाहीत, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी बैठकीत सांगितले.
नीरा-बारामती मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्या...
जेजुरी रेल्वेस्थानकासमोरील खुल्या ड्रेनेज लाईनमुळे...