2 minutes reading time (370 words)

एसटी गाड्यासह सर्व स्थानकांची दुरुस्ती, स्वछता आणि हिरकणी कक्ष उभारणीची गरज

एसटी गाड्यासह सर्व स्थानकांची दुरुस्ती, स्वछता आणि हिरकणी कक्ष उभारणीची गरज

जेजुरी स्थानक अद्ययावत करा : खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्य सरकारला पत्र

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील भोर, वेल्हा, मुळशी आदी तालुक्यासह अन्य सर्वच तालुक्यांतील एसटी स्थानकांच्या इमारती तसेच गाड्या आणि अन्य अडचणी दूर कराव्यात अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. विशेषतः राज्य आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जेजुरी स्थानकाची दुरुस्ती आणि सर्वत्र हिरकणी कक्ष सुरू करण्याबाबतही त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री तथा परिवन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली असून तसे पत्रही त्यांना पाठवले आहे.
नुकताच खासदार सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा केला. त्यावेळी भोर एसटी स्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी पाहणीही केली आहे. याशिवाय ठिकठिकाणच्या ग्रामस्थांकडून, एस. टी. प्रवास करताना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती मिळाल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. परिवहन महामंडळाच्या गाड्यांची संख्या वाढविण्यात यावी, तसेच गाड्यांचे वेळापत्रक नियमितपणे पाळण्यात यावे. बऱ्याच गाड्या फार जुन्या झाल्या आहेत. अस्वच्छ असतात. प्रवासादरम्यान बंद पडतात. अशा गाड्यांची दुरुस्ती वेळोवेळी केली जावी, असे त्यांनी म्हटले आहे.

काही गावांच्या जवळ असलेल्या महामार्गावर उड्डाणपूल असलेल्या ठिकाणी एसटी गाड्या पुलावरून जातात परिणामी गावांतील प्रवाशांची गैरसोय होते. तरी गाड्या उड्डाण पुलावरून न नेता, पुलाच्या खालील मार्गावरून नेली जावी.
काही एस. टी. स्थानकांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत, गळत आहे. एस. टी. स्थानकांमध्ये अस्वच्छता, कचरा पसरलेला देखील असतो. अशा इमारतींची देखभाल दुरुस्ती होणे व वेळोवेळी स्वच्छता होणे गरजेचे आहे. याबरोबरच प्रत्येक एस. टी. स्थानकावर हिरकणी कक्ष उभारण्यात यावा तसेच महिला, पुरुष व दिव्यांग प्रवाशांसाठी सोयीचे होईल अशा पद्धतीचे स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात यावी, असे सुळे यांनी म्हटले आहे.

पुरंदर तालुक्यातील जेजुरी हे नावलौकिक असलेले तीर्थक्षेत्र व भाविकांचे श्रद्धास्थान आहे. लाखो भाविक व पर्यटक जेजुरी येथे एसटीने येतात. अशा या जेजुरी एसटी स्थानकाची मात्र दुरवस्था झाली आहे. तरी या ठिकाणी सुसज्ज, अद्ययावत एसटी स्थानक असणे आवश्यक आहे, जेणेकरून येथे येणारे भाविकांना, वुद्ध, महिला, दिव्यांग व लहान मुले यांना सोयीचे होईल.

याबरोबरच भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील पौड व इंदापूर एस. टी. स्थानकांची दुरावस्था झाली आहे. या सर्वच एसटी स्थानकातील डांबरीकरण पावसामुळे उखडले गेले असून खड्डे पडले आहेत. तरी या एसटी स्थानकांचे कॉंक्रीटीकरण होणे गरजेचे आहे. याबाबत आपण वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करत आहोत, तरी प्रवाशांच्या सोयीचा सकारात्मक विचार करून राज्य परिवहन मार्गाच्या सेवेत सुधारणा करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. 

चांदणी चौकातील वाहन आणि पादचाऱ्यांच्या अडचणी अद्या...
बारामती लोकसभा मतदार संघातील दुष्काळी भागात चारा छ...