2 minutes reading time (325 words)

खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केलेली कविता होतेय व्हायरल

खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केलेली कविता होतेय व्हायरल

परंपरांचे जोखड आणि कर्तृत्वावान स्त्रीयांवर नेमके भाष्य

पुणे : जन्मापासून सौभाग्यवती ते मातृत्वापर्यंतचा प्रवास आणि या प्रवासात प्रत्यक्ष राष्ट्र उभारणीत सुद्धा स्वतःचं असं खास अस्तित्व स्त्रियांनी निर्माण केलं. तिच्या या कर्तृत्वाला सलाम करण्यापेक्षा परंपरांच्या जोखडात अडकवू पाहणारी पौरुषी मानसिकता यांचे नेमके विवेचन करणारी कविता खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलेली ती चांगलीच व्हायरल होत आहे.

खासदार सुळे यांनी आज सकाळी पोस्ट केलेली विनिता तेलंग यांची आहे. ही कविता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून लाईक्स आणि प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणावर येत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्यापासून राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्यापर्यंत आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापासून युद्धभूमीवर पती गमावून सुद्धा जराही न डगमगता स्वतःही लष्करात भरती होत देशाच्या सीमेवर उभी राहण्यास सिद्ध झालेल्या लष्करी अधिकारी महिलांची महती या कवितेत वर्णन करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे यांपैकी कोणाचाही नावानिशी उल्लेख कवितेतील कोणत्याही ओळीत अथवा शब्दात सापडणार नाही. परंतु राष्ट्रकार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या त्या महान स्त्रियांचे कर्तृत्वच इतके मोठे होते किंबहुना आहे, की नुसत्या वर्णनावरून ते व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहते.

एका बाजूला या कर्तृत्ववान स्त्रिया आणि त्याच वेळी परंपरेच्या जोखडातुन कधीही स्वतःला बाजूला न करणारी पुरुषी मानसिकता या कवितेत दर्शविण्यात आली आहे. स्त्री, मग ती कुमारी आहे का, सौभाग्यवती आहे, की विधवा, परित्यक्ता आहे, की पतीने नाकारलेली आहे अशा कोणत्या ना कोणत्या पुरुष सत्ताक रचनेत एखाद्या पुरुषाला आधार धरूनच तिचं अस्तित्व सांगण्याची पाहण्याची आपली मानसिकता, त्या मानसिकते मागे असलेला मनुवादी दृष्टिकोन याचे अत्यंत ओघवते आणि तितकेच दुर्दैवी वास्तव या कवितेत मांडण्यात आले आहे.

विधवा महिलांसाठी 'गंगा भागीरथी' अशी शब्दरचना विचाराधीन असल्याचे राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर समाजाच्या सर्व स्तरातून सरकारवर टीका झाली. परिणामी सरकारला तो विचार मागे घ्यावा लागला. गेले दोन तीन दिवस त्यावरून उभा महाराष्ट्र पुरता घुसळून निघाला. त्याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केलेली तेलंग यांची कविता नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस पडल्याचे दिसून येत आहे.
खासदार सुळे यांची भारत बांबू कंपनीला भेट
विधवा महिलांना 'गंगा भागीरथी' म्हणणे वेदनादायी