जगभर कांद्याची टंचाई, तर भारतात फेकून देण्याची वेळ
निर्यातबंदी मागे घेऊन कांदा जागतिक बाजारपेठेत पाठवा - खासदार सुप्रिया सुळे
देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मोठी आवक झाली. यामुळे बाजारभाव कोसळले असून शेतकऱ्यांवर अक्षरशः कवडीमोल भावाने कांदा विकण्याची वेळ आली आहे. काहीजणांनी तर कांदा उघड्यावर फेकून दिला आहे. भारतात ही स्थिती असताना दुसरीकडे जगभरात मात्र कांदा टंचाई असल्याच्या बातम्या येत आहेत. याचा अर्थ जगभरात मागणी असूनही निर्यातबंदीमुळे कांदा जागतिक बाजारपेठेत पाठविता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
डोळ्यांदेखत ही परिस्थिती असताना केंद्रीय कृषी आणि वाणिज्य मंत्रालय काय करत आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दोन्ही मंत्र्यांनी ही स्थिती पाहून तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. परंतु याबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत, ही मोठी खेदाची बाब असल्याची टीका खासदार सुळे यांनी केली आहे. कृषी आणि वाणिज्य या दोन्ही मंत्रालयांनी या परिस्थितीत एकत्रितपणे काम करण्याची गरज असून केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी तातडीने मागे घ्यायला हवी. देशातील जास्तीचा कांदा जागतिक बाजारपेठेत पाठविल्यास त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांना चार पैसे मिळावे अशी सरकारची इच्छा असेल तर याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक विचार करुन तातडीने निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
कृषीमालाच्या आयात-निर्यात धोरणात सातत्य नसल्याचा मोठा फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मोठी आवक झाली. https://t.co/EvmYxaosFO
— Supriya Sule (@supriya_sule) February 25, 2023