2 minutes reading time (345 words)

ग्रामीण भागातील पीएमपीएमएल बससेवा बंद करण्यावरून खासदार सुप्रिया सुळे संतापल्या

ग्रामीण भागातील पीएमपीएमएल बससेवा बंद करण्यावरून खासदार सुप्रिया सुळे संतापल्या मुख्यमंत्र्यानाही लक्ष घालण्याचे आवाहन निर्णय बदलला नाही, तर आंदोलनाचा इशारा

मुख्यमंत्र्यानाही लक्ष घालण्याचे आवाहन निर्णय बदलला नाही, तर आंदोलनाचा इशारा

पुणे, दि. २५ (प्रतिनिधी) - बारामती लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु असणाऱ्या पीएमपीएमएलच्या बससेवा बंद करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यावरून खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या असून गोरगरीबांची मुलं शिकावीत असं पीएमपीएमएलच्या कर्त्या-धर्त्यांना वाटत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या सगळ्या मार्गांवरील बससेवा सुरू ठेवा अन्यथा आपण स्वतः आंदोलन करू, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी, दौंड तालुक्यातील पाटस, मुळशी तालुक्यातील पौड पासून मुठा गाव, खडकवासला विधानसभा मतदार संघातील पानशेत, वरसगाव या मार्गांवर गेल्या एक दिन वर्षांत पीएमपीएमल बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. एसटीची अपुरी सेवा आणि खासगी वाहनांचे भरमसाठ भाडे अशा कात्रीत सापडलेल्या याभगतील शेकडो प्रवाशांना बस सेवा सुरू झाल्यामुळे मोठा आधार मिळाला आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, दूर अंतरावर काम करणारे कर्मचारी, आरोग्य सेवेसाठी शहरात जावे लागणारे रुग्ण इतकेच नाही, तर मार्केट यार्ड आणि मंडई मध्ये नित्यनेमाने येणारे किरकोळ भाजी विक्रेते तसेच शेतकऱ्यांनाही या बसचा मोठा आधार निर्माण झाला आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

अशा परिस्थितीत ही सेवा बंद झाल्यास या सर्वांचे मोठे हाल होणार असून सर्वसामान्य जनतेची ही हक्काची वाहतूक व्यवस्था बंद होणे योग्य ठरणार नाही. या भागातून धावणाऱ्या कोणत्याही बस पाहिल्या तर सतत त्या प्रवाशांनी भरभरून धावत असतात. यावरून या नागरिकांना त्यांची किती गरज आहे, ते लक्षात येते. ओसंडून वाहणाऱ्या बस तोट्यात कशा चालतात, याबाबत आपल्याला काही बोलायचे नाही, काही तांत्रिक कारणे असू शकतील. ती बाब समजून घेण्यासारखी नक्कीच आहे. तरीसुद्धा जरी हे मार्ग तोट्यात असले तरी व्यापक जनहीताचा विचार करता केवळ नफा-तोट्याचा विचार करुन ही सेवा बंद पाडणे सर्वथा अनुचित आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने हे लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्य सरकारने सुद्धा यामध्ये लक्ष घालून ही सेवा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे खासदार सुळे यांनी पुढे म्हटले आहे.

पीएमपीएमएल प्रशासनाला आपली कळकळीची विनंती आहे. ग्रामीण भागांतील या बससेवा कायम ठेवा. त्या बंद झाल्यास अथवा ज्या बंद केल्या आहेत त्या मार्गावरील बससेवा पुर्ववत सुरु झाल्या नाहीत, तर गोरगरीबांच्या हक्कासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्काच्या प्रवासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात मी स्वतः उतरेन याची कृपया आपण नोंद घ्यावी, असा इशारा त्यांनी दिला आहे.

केंद्राच्या वयोश्री योजनेचे बारामती मतदार संघात सर...
नवले पूल भागातील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी रस...