1 minute reading time (221 words)

महिला दिनी खासदार सुप्रिया सुळे यांची महिला कारभारी असलेल्या विशेष गावाला भेट

महिला दिनी खासदार सुप्रिया सुळे यांची महिला कारभारी असलेल्या विशेष गावाला भेट
पुणे : जगभरात आज महिला दिन साजरा केला जात आहे. पण हवेली तालुक्यातील रहाटवडे या गावाने वर्षातील पूर्ण ३६५ दिवस महिलांचा सन्मान केला आहे. येथील ग्रामपंचयात पूर्णपणे महिलाच चालवतात. बारामती लोकसभा मतदार संघातील या गावाला आवर्जून भेट देत खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व संदस्यांसहित गावकऱ्यांचेही कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

रहाटवडे गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील ग्रामपंचायत पुर्णपणे महिला चालवतात. विशेष म्हणजे सर्व महिलांची निवड बिनविरोध झाली आहे. फक्त एकच सदस्य पुरुष आहे. गावाचे संपूर्ण कामकाज आणि कारभार महिला चालवत असल्यामुळे शासनाने स्तरावरही गावचे कौतुक झाले असून पाणी योजनेसाठी गावाला भरघोस निधी मिळाला आहे.

याशिवाय या गावात उमेद अभियान यशस्वीपणे राबवण्यात आल्यामुळे, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त योजना या ठिकाणी राबविता येत आहेत. ही कामगिरी पाहून खासदार सुळे यांनी, या गावाने महिलांना प्राधान्य देऊन महाराष्ट्राचा पुरोगामी विचार जपला, हे अभिमानास्पद आहे. विकास हा होत असतो, पण जर सामाजिक परिवर्तन झाले नाही तर त्या विकासाला काहीच अर्थ राहत नाही, अशा शब्दात समस्त गावकऱ्यांचा गौरव केला.

त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे उदघाटन तसेच गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला (ग्रामीण) अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, नवनाथ पारगे, शुक्राचार्य वांजळे, सुरेश गुजर, पूजा पारगे, सचिन दोडके, प्रवीण शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहाटवडे ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. 

पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर...
आजच्या दिनी लिंगसमभावाचे तत्व रुळावे, म्हणत महिलां...