2 minutes reading time (348 words)

संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी खा. सुळे यांना उत्कृष्ट संसद मानरत्न पुरस्कार

संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी खा. सुळे यांना उत्कृष्ट संसद मानरत्न पुरस्कार

संसद मानरत्न आणि संसद महारत्न दोन्ही पुरस्कारांचे १७ फेब्रुवारीस दिल्लीत वितरण

पुणे, दि. ७ (प्रतिनिधी) – संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी आणि त्याचवेळी आपल्या मतदार संघातील नागरिकांसाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसद मानरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. याच संस्थेचा संसद महारत्न पुरस्कार सुद्धा दुसऱ्यांदा त्यांना जाहीर झाला असून येत्या १७ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे या दोन्ही पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून संसदरत्न, विशेष संसदरत्न, संसद महारत्न तसेच संसद मनरत्न पुरस्कार सुरु करण्यात आल्याचे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे. गेल्या तेरा वर्षांपासून संस्थेतर्फे हे पुरस्कार देण्यात येत असून येत्या १७ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. विद्यमान सतराव्या लोकसभेतील खासदार सुळे यांची उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग, मांडलेली खासगी विधेयके आणि एकूणच सर्वोत्तम कामगिरीसाठी त्यांना आतापर्यंत सात वेळा संसद रत्न, विशेष संसदरत्न, तर दोन वेळा संसद महारत्न आणि यावर्षी संसद मानरत्न या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे श्रीनिवासन यांनी म्हटले आहे.

खासदार सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून विद्यमान १७व्या लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे. त्यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात एकूण ९३ टक्के उपस्थिती लावत २३८ चर्चांमध्ये सहभाग घेतला. तब्बल ६०९ प्रश्न त्यांनी उपस्थित केले, इतकेच नाही, तर १६ खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केली आहेत. या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी त्यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार तसेच विशेष संसद महारत्न आणि संसद मानरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वीही त्यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

गत सोळाव्या लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सभागृहात ९६ टक्के उपस्थिती लावत एकूण १५२ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण ११८६ प्रश्न उपस्थित केले, तर २२ खासगी विधेयके मांडली. ही त्यांची कामगिरी विद्यमान १७ व्या लोकसभेतही कायम आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ज्युरी कमिटीचे चेअरमन व केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल आणि सह चेअरमन व भारतीय निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष टी एस कृष्णमूर्ती यांनी सुळे यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. खासदार सुळे यांची संसदेतील सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी आणि त्याच वेळी आपल्या मतदार संघातील नागरिकांसाठी जनहीताची केलेली कामे यांचा या पुरस्कार निवडीसाठी विचार करण्यात आला आहे. 

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करियर मार्गदर्शन ...
देशभरातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत खासदार...