1 minute reading time (200 words)

इंदापुरात भीमेकाठी भरतपूर अभयारण्याप्रमाणे पक्षीनिरीक्षण केंद्र विकसित करावे

इंदापुरात भीमेकाठी भरतपूर अभयारण्याप्रमाणे पक्षीनिरीक्षण केंद्र विकसित करावे खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य शासनाकडे पत्राद्वारे मागणी

खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य शासनाकडे पत्राद्वारे मागणी

इंदापूर, दि. १७ (प्रतिनिधी) - राजस्थानातील भरतपूर पक्षी अभयरण्याप्रमाणे इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव आणि तक्रारवाडी येथे भीमेच्या काठी शासन पुरस्कृत पक्षीनिरीक्षण केंद्र करता येऊ शकते. तरी इंदापूर तालुक्यात भीमा नदीच्या परिसरातील पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी रिसॉर्ट उभे करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.


राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे खासदार सुळे यांनी ही मागणी केली असून तसे लेखी पत्रही पाठवले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात हजारो किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगो आणि अन्य प्रजातीचे देशी तसेच परदेशी पक्षी येत असतात. येथे त्यांच्या अन्नपाणी व विणीच्या हंगामासाठी पोषक वातावरण असल्याचे पक्षी निरीक्षकांचे मत आहे. हजारोंच्या संख्येने याठिकाणी येणारे हे विविधरंगी आणि आकाराचे पक्षीजगत पाहण्यासाठी दरवर्षी येथे पक्षी अभ्यासकांची आणि पर्यटकांचीही मोठी गर्दी होत असते.

उत्तर भारतात राजस्थान मधील भरतपूर पक्षी अभयारण्य हे ठिकाण जसे पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे, त्याच धर्तीवर कुंभारगाव आणि तक्रारवाडी देखील पक्षी निरीक्षणासाठी विकसित होऊ शकतात. याठिकाणी पर्यटकांसाठी राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय केली तर हे ठिकाण देश-विदेशात पक्षी निरीक्षणासाठी उत्तम केंद्र म्हणून ओळखले जाईल. तरी राज्य सरकारने या दोन ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सुसज्ज असे रिसॉर्ट उभारावे, असे सुळे यांनी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

चाळिसाव्या वर्षी एमपीएससी उत्तीर्ण होणाऱ्या माजी स...
फुरसुंगी कचरा डेपो समस्या पुन्हा डोके वर काढतेय; त...