By newseditor on Friday, 12 October 2018
Category: पुणे शहर

दुष्काळी परिस्थितीचे भान राखा; सत्कारांवर खर्च नको : सुप्रिया सुळे




सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यांनंतर आज (दि. ११) आज त्या जळगाव जिल्ह्यात आहेत. या दौऱ्यात त्यांची भेट घेणारे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यानी हारतुरे किंवा सत्कारांवर खर्च करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. ''राज्यातील बहुतांश ठिकाणी दुष्काळाची स्थिती गंभीर असुन बळीराजासह सर्वच घटक दुष्काळामुळे अडचणीत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शक्यतो आदर सत्कारावरील आपल्या दौऱ्यादरम्यान हारतुरे, सत्कार यांवर खर्च करण्याचे टाळावे. आपले बांधव दुष्काळामुळे होरपळत असताना सत्कार, हारतुरे स्वीकारणे योग्य नाही,'' असे त्यांनी म्हटले आहे.


सत्कारावर होणारा खर्च टाळून ती रक्कम दुष्काळ निवारणासाठी वापरावी. खरेतर या स्थितीची सरकारी यंत्रणेने आणि सत्ताधाऱ्यांनी स्वतःहून दखल घेऊन दुष्काळ निवारणासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाचे नेते राज्यात दुष्काळ नाहीच असे चित्र उभा करीत आहेत. हे खेदजनक आणि असंवेदनशीलतेचे अत्युच्च टोक देखील आहे. कसलीही घोषणा अथवा पुर्वसूचना न देता राज्यात ठिकठिकाणी भारनियमन, विजकपात सुरु आहे. शेतीला आणि पिण्याला पाणी देतानाही हात आखडता घेतला जात आहे, असा आरोप ही सुळे यांनी राज्य सरकारवर केला आहे. दुष्काळ जाहीर करायला विलंब का होतोय? सरकारने संवेदनशीलता जपत मराठवाडा आणि अन्य ठिकाणी जेथे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे, त्या त्या ठिकाणी तातडीने दुष्काळ जाहिर करुन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

http://www.esakal.com/pune/be-aware-drought-conditions-do-not-spend-felicitates-said-supriya-sule-149138