By Editor on Friday, 20 January 2023
Category: दौंड

[Sakal]पाटस पोलिस चौकीचे ठाणे करा-सुप्रिया सुळे

पोलिस चौकीला खासदार सुप्रिया सुळे यांची भेट

as  पाटस,- पाटस (ता. दौंड) येथील पोलिस चौकीला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी पाटस पोलिस ठाणे होण्याच्या मागणीसाठी सुळे यांनी पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांना थेट फोन करून तत्काळ लक्ष घालण्याच्या सूचना केल्या.

दौंड तालुक्यात यवत पोलिस ठाणेअंतर्गत येणाऱ्या पाटस पोलिस चौकीच्या कार्यक्षेत्रात महामार्ग, राज्यमार्ग, घाट आदी आहेत. शिवाय गुन्हेगारीचा आलेखही वाढत चालला आहे. चौकीच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावे मोठ्या लोकसंख्येची व संवदेनशील आहेत. त्यातुलनेत पोलिस चौकीची यंत्रणा तोकडी आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही वर्षापासून पाटस पोलिस चौकीचे पोलिस ठाणे होणार असल्याच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु आहेत. इतर तालुक्यातील काही प्रस्तावीत पोलिस ठाणे मंजूरही झाले. मात्र, पाटस पोलिस ठाणे अद्यापही लालफितीत अडकले आहे. गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता पाटस पोलिस ठाणे तत्काळ मंजूर व्हावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
खासदार सुळे यांनीच पाटस पोलिस ठाणे होण्यासाठी लक्ष घालावे, अशी थेट मागणी काही नागरीकांनी केली. याची दखल घेत त्यांनी नियोजित दौरा नसतानाही पाटस पोलिस चौकीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पोलिस व पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी थेट पोलिस अधिक्षक गोयल यांच्याशी संपर्क साधला. पाटस पोलिस ठाणे होण्यासाठी नक्की काय अडचणी आहेत, याची माहिती करून घेत पोलिस ठाणे होण्यासाठी लक्ष घालावे, अशी सूचना त्यांना केली.

यावेळी पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्याकडून पोलिस चौकीच्या कामकाजाची चर्चा केली. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, सरपंच अवंतिका शितोळे, शिवाजी ढमाले, रामभाऊ टुले, शीतल चव्हाण, अजित शितोळे, विकास खळदकर आदी उपस्थित होते.


पुणे जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. कोयता गॅंग कसली माहीत पण नव्हते, आता त्यांनी धुमाकूळ घातला आहे. या सरकारच्या काळात कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
- सुप्रिया सुळे, खासदार

पाटस पोलिस चौकीचे ठाणे करा | Sakal

Leave Comments