By newseditor on Wednesday, 19 September 2018
Category: प्रेस रिलीज

'गुजर-निंबाळकरवाडीतील प्रस्तावित रिंगरोड बाधितांचा प्रश्न सोडवणार'

खासदार सुप्रिया सुळे यांची ग्वाही पुणे, दि. १७ (प्रतिनिधी) – गुजर-निंबाळकरवाडी येथील प्रस्तावित पीएमआरडीएच्या रिंगरोडमुळे या भागातील काही नागरिकांची घरे बाधित होत आहेत. त्यांची घरे पाडण्यापेक्षा यातून सर्वसमावेशक तोडगा निघावा अशी आमची भूमिका आहे. यादृष्टीने मी प्रयत्न करीत आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथील नागरिकांना दिली. गुजर-निंबाळकरवाडी या गावातून रिंगरोडची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे या गावातून रस्त्याला विरोध होत आहे. येथील सर्व्हे क्रमांक १२ मधील अनेक घरे या रिंगरोडमुळे उध्वस्त होणार असून त्यांचे संसार उघड्यावर येतील. या कुटुंबांचा विचार करावा, आणि आपण याकामी लक्ष घालून मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी आज सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.

वास्तविक रिंगरोडचा प्रस्ताव १९९७ मध्ये आला. त्यानंतरही या भागात जागा विक्री होत राहिली. अनेकांनी जागा खरेदी करून घरे बांधली आहेत. त्याचवेळी येथील जमीन खरेदी विक्रीला पायबंद घातला असता तर ही वेळ आली नसती. असे न करता याठिकाणी घरे उभारू दिली आणि आता १९९७ च्या प्रस्तावानुसार रिंगरोडसाठी जागेची मोजणी सुरु करण्यात आली आहे. मोजणी होताच घरे पडली जातील. या भीतीने येथील अनेकजण भयग्रस्त झाले आहेत. पीएमआरडीएने याबाबत सर्वसमावेशक तोडगा काढावा, त्यासाठी सुळे यांनी मध्यस्ती करावी, अशी मागणी येथोल नागरिकांनी निवेदनात केली आहे.

त्यानुसार त्यांचे म्हणणे ऐकून घेत सुळे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांच्याकडे योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात लोकांच्या हिताचा विचार करून मध्यम मार्ग काढावा, यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.