By Editor on Monday, 07 October 2024
Category: Press Note

दौंड-पुणे डेमूला अंतिम थांबा पुणे रेल्वेस्थानकच

खासदार सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

दौंड : दौंड-पुणे-दौंड डेमू रेल्वे (०१५२२) प्रशासनाने मार्च २०२३ पासून पुणे स्टेशन ऐवजी हडपसर येथे थांबविण्याचा निर्णय घेतला घेतला होता. या निर्णयामुळे विद्यार्थी, कामगार, कर्मचारी, अधिकारी, दुग्धव्यावसायिक आणि इतर नागरिकांना मोठा फटका बसत असल्याने याबाबर फेरविचार करावा, यासाठी खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने केंद्र सरकारकडे मागणी करत होत्या. त्याला अखेर यश आले असून पुणे रेल्वे स्टेशन हेच डेमुचे अंतिम स्थानक असल्याचे मान्य करत ही गाडी पुण्यापर्यंत सोडण्यात येत आहे.

ही गाडी पुणे स्टेशन ऐवजी हडपसर स्टेशन वर थांबवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने मार्च २०२३ मध्ये घेतल्याबरोबर लगेचच खासदार सुळे यांनी आश्विनी वैष्णव यांना पत्र देत ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरच थांबवणे योग्य असल्याचे म्हटले होते. दौंड -पुणे-दौंड या मार्गावर नियमित धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये उभा राहणे सुद्धा मुश्किल होते, इतकी गर्दी असते. त्यातच डेमू हडपसरला थांबणार असल्याने त्या गाड्यांवर आणखी गर्दीचा भार पडणार असल्याचे त्यांनी रेल्वे मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले होते. त्यानंतरही वारंवार पत्राद्वारे आणि प्रत्यक्ष भेट घेऊन खासदार सुळे यांचा यासाठी पाठपुरावा सुरू होता.

दौंड-पुणे-दौंड डेमू ही गाडी पुण्याला पोहोचण्यासाठी एक तास चाळीस मिनिटे एवढा वेळ घेते. ती जर हडपसरला थांबवली, तर गर्दी आणि वेळ वाढणार. परिणामी नियमित प्रवास करणारे, विद्यार्थी, कर्मचारी, लहानमोठे व्यावसायिक, दूध विक्रेते यांचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे या गाडीच्या स्थानकात बदल करू नये, अशी मागणी खासदार सुळे या सातत्याने करत होत्या. अखेर या मागणीला यश आले असून दौंड पुणे डेमूचा अंतिम थांबा पुन्हा एकदा पुणे रेल्वे स्टेशन हाच झाला आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. 

Leave Comments