By Editor on Tuesday, 24 November 2026
Category: Press Note

देऊळगाव रसाळ येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

पाटबंधारे विभागाचे अधिकारी आज घेणार उपोषणकर्त्यांची भेट; सर्वोतापरी मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील देऊळगाव रसाळ व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेसंदर्भातील विविध मागण्यांसाठी सोमवारपासून (दि. २३) देऊळगाव रसाळ ग्रामपंचायतीसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थ आणि पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

खासदार सुळे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली. त्यानुसार पाटबंधारे विभागाचे अधिकारी देऊळगाव रसाळ येथे भेट देऊन ग्रामस्थ व उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करून त्यांच्या मागण्यांसंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करतील, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. 

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

नऊ शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

या मागण्यांसाठी नागेश शंकर रसाळ, आनंद ज्ञानदेव रसाळ, तानाजी महादेव रसाळ, अमोल बाबूराव वाबळे, राजेंद्र श्रीरंग रसाळ, अनिल काशीनाथ वाबळे, रामदास काशीनाथ थोरात, अश्पाक याकुभभाई इनामदार आणि पांडुरंग मोहन रसाळ हे नऊ शेतकरी बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत.

शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्या शेतीच्या पाण्याशी आणि त्यांच्या उपजीविकेशी निगडित आहेत. त्यामुळे प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक तोडगा काढावा. तसेच उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाला केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
Leave Comments