By Editor on Monday, 27 March 2023
Category: Press Note

केंद्राच्या पंतप्रधान पुरस्कारासाठी आयपीएस तेजस्वी सातपुते यांचे खा. सुळेकडून अभिनंदन

दिल्ली : प्रशासनातील उत्कृष्ट सेवेसाठी केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा पंतप्रधान पुरस्कार (पीएम अ‍ॅवॉर्ड फॉर एक्सलन्स इन पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) जाहीर झाल्याबद्दल वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी आयपीएस तेजस्वी सातपुते यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदी कार्यरत असताना तेजस्वी सातपुते यांनी ऑपरेशन परीवर्तन हा उपक्रम राबवला होता. जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्याबरोबरच बेकायदा दारू निर्मिती आणि विक्रीच्या मुळाशी जाऊन त्यांनी अनेक गावांतील हे बेकायदा व्यवसाय बंद तर केलेच, पण ते करणाऱ्या अनेकांना मानाचे काम करण्यास प्रवृत्त केले. त्यातले कित्येकजण आजही शेती, मजुरी आणि अन्य कामे करत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील तब्बल साठ गावांमध्ये हे ऑपरेशन परिवर्तन राबविण्यात आले होते. त्याचे सकारात्मक परिणाम आजही दिसत असून एकेकाळी बेकायदा दारूचा व्यवसाय करणारे लोक आज अभिमानाने अन्य कामे करून आपापल्या कुटूंबाचा खर्च भागवत आहेत. या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सातपुते यांचे खास कैतुक तर केलेच. शिवाय केंद्रीय गृहमंत्र्यांना याची माहीती देऊन हा उपक्रम सविस्तर समजवून सांगितला.

आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या या उपक्रमाची देशभरात दखल घेतली गेली. तशीच केंद्र सरकारनेही त्याची दखल घेतली आणि प्रशासनिक कार्यात उत्कृष्ट कामासाठी दिला जाणारा पंतप्रधान पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. यांसाठी खासदार सुळे यांनी पुन्हा एकदा सातपुते यांचे कौतुक आणि अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छाही दिल्या आहेत. 

Leave Comments