2 minutes reading time (493 words)

हिंजवडी आणि परिसरातील विकास कामे आणि देखरेखीसाठी सक्षम व्यवस्था आवश्यक

हिंजवडी आणि परिसरातील विकास कामे आणि देखरेखीसाठी सक्षम व्यवस्था आवश्यक

प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेण्याची गरज असल्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

हिंजवडी - हिंजवडी आणि परिसरातील विकास कामे आणि देखरेखीसाठी एक सक्षम व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यानी जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांची एकत्रित बैठक घ्यावी. हिंजवडी तसेच माण, मारुंजी भागातील रस्ते वाहतूक आणि अन्य समस्या सोडविण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यानी पुढाकार घेण्याची गरज असून तशी मागणी आपण करणार आहोत, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिली.

हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क आणि अन्य सोसायट्या तसेच माण येथील रहिवासी भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्याचा वाहनचालक तसेच सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आज या भागाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, 'लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि सरकारसोबत आम्ही एकत्र येऊन हिंजवडी परिसरातील अडचणी सोडवू. आपण स्वतः महिन्यातून दोन वेळा हिंजवडीला भेट देऊन कामाची पाहणी करणार आहे.'

हिंजवडी आणि परिसरातील विकास कामे आणि देखरेखीसाठी एक सक्षम व्यवस्था असणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेता येथील समस्यांबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करणार आहे . याखेरीज मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी सातत्याने करीत आहे, असेही त्या म्हणाल्या. या भागातील नाले सफाई, राडारोडा आणि अतिक्रमणविरोधी कारवाई ही कामे येत्या २६ जुलैपर्यंत पूर्ण झाली तर आम्ही अधिकाऱ्यांचा सत्कार करु, मात्र कामे झाली नाहीत, तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असा इशाराही सुळे यांनी यावेळी दिला.

हिंजवडी परिसरातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ द्यावी अशी आमची त्यांना विनंती आहे. विरोधी पक्षात असलो तरी येथील समस्या सोडवण्यासाठी सरकारला हवे ते पूर्ण सहकार्य करू, हा माझा शब्द आहे. हे सांगताना त्यांनी बंगळुरू येथील उदाहरण दिले. त्या म्हणाल्या, बंगळुरूचे खासदार पी. सी. मोहन यांनी तेथील वाहतूक आणि रस्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तिथल्या कंपन्याशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याशी संपर्क साधून त्या पद्धतीने इथेही काही प्रयोग राबवता येतील का याचा विचार करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. या भागातील शाळांच्या वेळेत थोडासा बदल केल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास काही अंशी मदत होईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आपल्या दौऱ्यात हिंजवडी फेज-१ ते माण रस्ता, माण फेज-३ ते मेट्रो स्टेशन कारशेड रस्ता, माण फेज-३ ते मेगापोलीस रस्ता, भोईरवाडी रस्ता, हिंजवडी फेज-२ ते डोहेलर कंपनी रस्ता, हिंजवडी ते मारुंजी रस्ता टी जंक्शन या रस्त्यांची पाहणी केली; आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पाण्याचे नैसर्गिक स्रोत बुजवण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहते, वीज पुरवठा देखील सतत खंडित होतो, या भागात अनेक नवीन प्रकल्प सुरू असून त्यांच्याकडून नियमांचा भंग होत असल्यामुळे नागरिकांना ध्वनी प्रदूषण आणि इतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून प्रचंड त्रास आणि मनस्तापही सहन करावा लागत आहे. अनेक पायाभूत सुविधांची देखील दुरावस्था झालेली आहे. देशातील सर्वात मोठे आयटी पार्क असल्यामुळे हिंजवडी येथे अनेक नामांकित कंपन्या आणि सांगणक क्षेत्रातील कित्येक तज्ज्ञ कामासाठी येत असतात. त्यांना या समस्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, अशा अनेक समस्या यावेळी स्थानिक नागरिकांनी सुळे यांच्यासमोर मांडल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता दगडे, प्रशासकीय अधिकारी, स्थानिक नागरिकांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले होते. 

महिलांचे कर्तृत्व नाकारणाऱ्या देशाची प्रगती होऊ शक...