खासदार सुळे यांनी मानले गडकरींचे आभार
पुणे: खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पालखी महामार्ग अर्थात सासवड रस्त्यावरील हडपसर ते दिवे घाटाचा माथा या दरम्यानचे काम करण्यासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला असून ३९९ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे लवकरच हे काम सुरू होणार असून पुरंदर आणि हवेली तालुक्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील वडकी नाला ते पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी दरम्यानचा भाग म्हणजेच दिवे घाटाचा भाग वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने आतापर्यंत अपूर्ण होता. येथील रस्ता रुंदीकरण आणि अन्य सर्वच कामे करण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यासाठी खासदार सुळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. खासदार शरद पवार यांनी देखील केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता.या पाठपुराव्याला अखेर यश आले असून हडपसर ते दिवे घाट माथा येथील झेंडेवाडी या भागातील काम करण्यास परवानगी मिळाली आहे. या मार्गाची ३९९ कोटी रुपयांची निविदा १३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर ४५ दिवसांनंतर मंजूर झाल्यानंतर हे काम लवकरच सुरू होईल. याचा पुरंदर आणि हवेली तालुक्यातील जनतेला मोठा फायदा होणार आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेतल्याबद्दल खासदार सुळे यांनी नीतीन गडकरी यांचे मनापासून आभार मानले आहेत.