कमिशनरच्या दारात पहिला हंडा घेऊन मी उभी राहते'
Solapur : सोलापूरसारख्या शहरात पाच दिवसांतून एकदा पाणी येतं. स्मार्ट सिटीमध्ये सोलापूर कागदावर पुढे होतं आणि त्याला बक्षीस मिळतं तर सात दिवसांतून एकदा पाणी कसं येतं. सोलापुरात जोपर्यंत ट्रिपल इंजिन सरकार आम्हाला पाणी देत नाही, आम्ही पाणीपट्टी भरणार नाही. पाणीपट्टी आजपासून भरू नका, त्यासाठी हंडा घेऊन कमिशनरच्या ऑफिसमध्ये पहिली मी उभी राहीन, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, मी विकासाच्या विरोधात नाही. त्यांनी नागपूर आणि पुण्यामध्ये मेट्रो केली, आम्ही त्याचं स्वागत केलं. मेट्रोसाठी त्यांच्याकडे हजारो कोटी रुपये आहेत, पण तुमच्यासारख्या गरीब मुलांसाठी एसटी फिरविण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. बससेवा चांगली चालते का? मग आपल्याला मेट्रो पाहिजे की एसटी पाहिजे.
हे पैसे जे सरकार पाडण्यासाठी आणि आमदार विकत घेण्यासाठी तुम्ही वापरता, ते सोलापूरच्या पाण्यासाठी द्या. आमचे आशीर्वाद तरी तुम्हाला मिळतील. 'बहोत हो गई पाणी की कपात, इस बार इंडिया सरकार' अशी नवी टॅगलाइन सुप्रिया सुळे यांनी सोलापुरातून दिली.
निवडणुकीमुळे गॅस सिलिंडरचे दोनशे रुपये कमी झाले. आता काय काय जुमले बघायला मिळणार माहिती नाही. स्मार्ट सिटीचं बक्षीस सोलापूरला कसं मिळालं. एकदा बटन दाबले की परत रेट वाढणार, सात दिवसांचं पाणी १० दिवसांवर जाणार. राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आम्हालाच या या तारखेला मिळणार, कसं म्हणतात. त्या पद्धतीने हे कॉपी करून पास झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, माझं वैयक्तिक भाजपशी काही भांडण नाही. माझी लढाई ही त्यांच्या वैचारिक आणि धोरणाविरोधात आहे. जाती-जातीत ते भांडण लावून देतात. बारामतीला सांगितलं धनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण देऊ, पण अद्याप ते दिलं नाही.
कर्नाटकातील लिंगायत समाजाचे येडियुरप्पा एवढे मोठे नेते, पण त्यांचंही तिकीट कापलं आणि त्यांनाही घरी पाठवलं. कर्नाटकात येडियुरप्पांचा अपमान केला; म्हणून भाजपला हार पत्करावी लागली. घरातल्या ज्येष्ठांचा तुम्ही असा जर अपमान करत असाल, तर कोणाच्या जिवावर कर्नाटकात भाजप निवडून आली.? भाजपमध्ये आता दोन गट आहेत. एक ओरिजिनल आणि एक 2.0/व्हर्जन 2. ओरिजिनल भाजपमध्ये सुसंस्कृत लोक होते. सुषमा स्वराज, नितीन गडकरी, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी हे चांगले नेते होते, आमची कटुता असायची थोडी थोडी; पण आता तर एक घाव दोन तुकडे असा प्रकार आहे, असेही सुळे यांनी नमूद केले.
फडणवीसांना चिमटे
मला देवेंद्र फडणवीस यांचं फार वाईट वाटतं, इट्स व्हेरी सॅड. राज्यात १०५ आमदार निवडून आले. म्हणजे १० पैकी १० मार्क. सगळ्या मेरिटवर देवेंद्र फडणवीस पास झाले. त्यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं की नाय, पण त्यांना उपमुख्यमंत्री केलं आणि पाच मार्क केले. त्यानंतर अडीच मार्क करत आणखी एक उपमुख्यमंत्री केले. म्हणजे १० मार्क मिळवलेल्या पोराला भाजपने नापास करून अडीच मार्कावर आणलं. आता माझी त्यांच्या नेत्यांना विनम्रपणे विनंती आहे की, आमचा हा भाऊ कर्तृत्ववान आहे, त्यावर असा अन्याय करू नका.