By Editor on Sunday, 07 July 2024
Category: Uncategorized

[Maharashtra Times]माझ्यावर खोटेनाटे आरोप, दादांचा 'संदेश';

'लाडकी बहीण' थेट फडणवीसांवर बोलली, एका वाक्यात कोंडी

मुंबई: राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही. राज्याची जनता हाच माझा पक्ष आहे. माझ्या मनात कायम जनहिताचा, लोककल्याणाचा विचार सुरु असतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला भावनिक साद घातली. अर्थसंकल्पावर विरोधकांना केलेल्या टिकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांचा उल्लेख केला. त्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

विरोधकांना राजकारण करत राहू द्या. मी माझं काम करत राहणार. राज्यातील जनता हाच पक्ष आहे आणि तो कायम राहील. अर्थसंकल्पावर नकारात्मक लोक अकारण टीका करताहेत. काही जणांनी तर लबाडा घरचं आवातण म्हटलं. आणखीही बऱ्याच नावांनी हिणवलं जातंय. बाकीच्यांमध्ये आणि माझ्यात हाच फरक आहे. ते राजकारण करणारे आहेत आणि तुमचा अजितदादा काम करणारा आहे. राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही. राज्यातील जनता हाच माझा पक्ष आहे. आधीही आणि आताही मी जनतेचाच आहे, अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी भावनिक साद घातली.

माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप केले गेले. पण भ्रष्टाचाराचा एकही आरोप आतापर्यंत सिद्ध झालेला नाही आणि भविष्यात होणारही नाही, असं अजित पवार म्हणाले. यावर अजित पवारांची बहीण आणि बारामतीच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केले. त्यामुळे आता यावर त्यांनीच उत्तर द्यावं, असं सुळे म्हणाल्या.

लोकशाहीत प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. पण अजित पवारांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी केलेला तो व्हिडीओ सरकारचा आहे की पक्षाचा, ते कळलं नाही. कारण त्यात पक्षाचं चिन्ह होतं. त्यामुळे मी संभ्रमात आहे की तो व्हिडीओ त्यांनी उपमुख्यमंत्री पदावरुन केलाय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून केला आहे. सशक्त लोकशाहीत प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. पण राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरुन कोर्टात केस सुरु आहे. त्यामुळे निर्णय येईस्तोवर चिन्ह वापरताना खाली फूटनोट असलीच पाहिजे. त्यांच्या टिमनं जेव्हा ते चिन्ह लावलं तेव्हा ते फूटनोट लावायला विसरले, याकडे सुळेंनी लक्ष वेधलं. 

माझ्यावर खोटेनाटे आरोप, दादांचा 'संदेश'; 'लाडकी बहीण' थेट फडणवीसांवर बोलली, एका वाक्यात कोंडी - mp supriya sule ask for clarification from devendra fadnavis after ajit pawar talks about corruption allegations - Maharashtra Times

Leave Comments