प्रफुल्ल भंडारी, सोमवार, 30 एप्रिल 2018
[caption id="attachment_1126" align="alignnone" width="300"] सिद्धेश्वर_हॉस्पिटल_दौंड
दौंड (पुणे) : राज्यातील पहिला अॅनिमिया मुक्त व कुपोषणमुक्त तालुका म्हणून दौंड तालुक्याची ओळख निर्माण करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची नितांत गरज आहे. पुणे जिल्हा परिषदेसह तालुक्यातील खासगी रूग्णालये, दौंड मेडीकल असोसिएशन व अन्य संस्थांनी याकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
दौंड येथे सिध्देश्वर मॅटर्निटी, सर्जिकल व जनरल हॅास्पिटलचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले व त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह डॅा. दत्तात्रेय लोणकर, राणी शेळके, झुंबर गायकवाड, वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे, आनंद थोरात, डॅा. सुनीता कटारिया, बबन लव्हे, अॅड. अजित बलदोटा, नंदकुमार पवार, आदी उपस्थित होते. हॅास्पिटलचे प्रमुख डॅा. मयूर महादेव भोंगळे यांनी प्रास्ताविकात या सुसज्ज हॅास्पिटल मधील उपलब्ध सुविधा आणि औषधोपचारांविषयी माहिती दिली.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ``नीती आयोगाच्या अहवालानुसार मागील तीन वर्षात देशात कुपोषण आणि स्त्रीभ्रुणहत्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून ते अतिशय गंभीर आहे. विशेषकरून महिलांमध्ये रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया आणि बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी व्यापक प्रमाणावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी हेल्थ कार्ड उपलब्ध करून देत त्याद्वारे रक्त तपासणी, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, आदींची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील महिला अॅनिमिया मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.``
त्या पुढे म्हणाल्या, ``जैव वैद्यक कचर्याचे योग्य व्यवस्थापन केले जात नसल्याने आपल्या आरोग्यासह पर्यावरणावर देखील विपरीत परिणाम होत आहे. या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारण्याची गरज आहे. तालुक्यातील डॅाक्टर मंडळींनी त्यासाठी पुढाकार घेऊन कुरकुंभ येथील कंपन्यांच्या कार्पोरेट सोशल रिस्पॅान्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून निधी उभारून प्रकल्प केला कार्यान्वित केला पाहिजे.``
शशांक मोहिते व रवी पवार यांनी सूत्रसंचालन केले तर माजी सभापती रंगनाथ फुलारी यांनी आभारप्रदर्शन केले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी डॅा. मयूर व डॅा. अनुराधा भोंगळे यांनी जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेत उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करीत गरीब आणि गरजूंची सेवा करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे काबाडकष्ट करून तिन्ही मुलांना उच्च शिक्षित करणारे महादेव भोंगळे व हिराबाई भोंगळे यांचा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
http://www.esakal.com/pune/make-daund-tehsil-anemia-and-malnutrition-free-says-supriya-sule-113263