दौंड : ''राज्यात तीव्र दुष्काळ असताना विधानसभा मतदारसंघनिहाय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसाठीचे सीएम चषक सुरू झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुष्काळाविषयीची असंवेदनशीलता या निमित्ताने पुढे आली आहे. सीएम चषकासाठी 288 मतदारसंघांत सरकारी यंत्रणांचा वापर, हा दुर्दैवी प्रकार आहे,'' अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
दौंड येथे आज (ता. 2) पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी ही टीका केली. त्या म्हणाल्या, ''सीएम चषकाच्या निमित्ताने सरकारची असंवेदनशीलता दिसून येते. चषकाला माझा विरोध नाही; परंतु वेळ चुकीची आहे. दुष्काळात होरपळणाऱ्यांना आधार देऊन अडचणीत असलेल्यांना मदत करण्यास राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. सगळं बाजूला ठेवून सरकारने दुष्काळ निवारणाला प्राधान्य द्यावे. राज्यात बेरोजगारी, महागाई, असुरक्षितता आणि दूषित सामाजिक वातावरणामुळे अस्वस्थता असताना सत्ताधाऱ्यांना त्याचे गांभीर्य नाही. जाहिरातबाजीवर तुफान खर्च करणारे हे सरकार आहे. जनतेला हे सरकार वाटत नसून, एखादा प्रॉडक्ट वाटावा, अशा पद्धतीने कारभार सुरू आहे. राज्याबद्दल भाजप-शिवसेनेचे नेते बोलत नाहीत. राज्य सरकारची कोणतीही योजना चाललेली नाही. आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या या युतीने लोकांची फसवणूक केली आहे.''
अभ्यास आणि नियोजनाचा अभाव असलेल्या शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचे काम योग्य नाही. जलयुक्तचे जे काही काम झाले, त्याचे श्रेय अभिनेता अमिर खान व पाणी फाउंडेशनचे आहे. - सुप्रिया सुळे, खासदार
https://www.esakal.com/pune/supriya-sule-criticises-cm-devendra-fadnavis-over-drought-situation-153060