दौंड रेल्वे स्थानकात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तीन तास धरणे आंदोलन केले.
By लोकमत न्यूज नेटवर्क
या वेळी घोषणाबाजीने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. सकाळी ६ वाजता सुप्रिया सुळे यांनी दौंड-पुणे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर रेल्वे प्रबंधकांच्या कार्यालय परिसरात धरणे आंदोलन सुरू केले. या वेळी पक्षाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, गुरुमुख नारंग, अॅड. अजित बलदोटा, सोहेल खान, बादशहा शेख, झुंबर गायकवाड, प्रवीण शिंदे, नागसेन धेंडे, राणी शेळके, सारिका पानसरे, योगिनी दिवेकर, वैशाली धगाटे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या वेळी सुळे म्हणाल्या, ‘‘पुणे-दौंडदरम्यान विद्युत लोकल तातडीने सुरू झाली पाहिजे. दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडले गेले पाहिजे. कडेठाण, मांजरी येथील बंद पडलेली रेल्वेची कामे तातडीने सुरू झाली पाहिजेत. प्रभाग क्र. ५ मधील रेल्वे अधिकाºयांनी थांबविलेली कामे तातडीने सुरू झाली पाहिजेत. रेल्वे झोपडपट्टी कुठल्याही परिस्थितीत हलवू दिली जाणार नाही. रेल्वे परिसरात पाणीटंचाई आहे.
‘मीटू’च्या प्रश्नावर मोदी गप्प का?सध्या राजकीय आणि सांस्कृतिक स्तरावर ‘मीटू’चा प्रश्न गाजतोय. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यावर २० महिला आरोप करतात. त्यात काहीतरी तथ्य असावे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बेटी बचाव’चा नारा देतात, दुसरीकडे ‘मीटू’वर गप्प का? हा विषय राजकीय नसून सामाजिक आहे. तेव्हा संबंधित मंत्र्यांची चौकशी झाली पाहिजे. केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे सरकार नसून प्रॉडक्ट आहे. केवळ जाहिरातबाजीवर हे सरकार तरलेले आहे. जलयुक्त शिवाराचे श्रेय सिनेअभिनेता आमिर खान यांना दिले पाहिजे. मात्र, हे श्रेय भाजपा सरकार लाटत आहे. सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून दुष्काळावर मात करण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे.