पुणे – यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारे ''यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार आणि यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता पुरस्कार' घोषित करण्यात आले. पाच ज्येष्ठ नागरिक आणि एका ज्येष्ठ नागरिक संघाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून येत्या ६ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील चव्हाण सेंटर येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. ठाणे येथील विजया शिंदे, बीड येथील कमल बारुळे, पुणे येथील ज्ञानेश्वर खरात, कोल्हापूर येथील सोमनाथ गवस, अकोला येथील विनायक बोराळे यांना 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार' देण्यात येणार आहे. तर यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था कृतज्ञता सन्मान जळगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघास घोषित करण्यात आला आहे. माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, स्वतः खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रौप्य महोत्सवी आनंद मेळाव्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
चव्हाण सेंटरच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या आनंद मेळाव्यात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. आनंद मेळाव्याचे यंदाचे वर्ष हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. तर पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून नि:स्वार्थपणे काम करत समाजाच्या जडण घडणीमध्ये योगदान देणाऱ्या पाच ज्येष्ठांना व एका ज्येष्ठ नागरिक संघाचा सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेल्या 'ज्येष्ठ जाणता – सक्षम ज्येष्ठांचा पथदर्शक' पुस्तकाचे प्रकाशन या सन्मान सोहळ्यात होणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवानिवृत्त झाल्यानंतर, आपल्या अनुभवाच्या जोरावर समाजाभिमुख कार्य करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत; त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघ देखील आहेत. जे कोणत्याही स्वार्थाशिवाय कार्य करीत आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान व्हावा हा या पुरस्काराचा उद्देश आहे,असे त्यांनी नमूद केले.
यशवंतराव चव्हाण सेंटरचे राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर - Maharashtra Lokmanch