सुप्रिया सुळेंची टोकाची टीका
नागपूर क्राईम कॅपिटल झालं आहे, ते जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा क्राईम रेट वाढतो, अशी टीका सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. त्या महिला पदाधिकारी मेळावा बैठकीत बोलत होत्या. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने ही मेळावा बैठक आयोजित करण्यात आली होती. (Latest News)
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर टीका केली. राज्याची परिस्थिती गंभीर आहे. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. ते जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा-तेव्हा नागपूरमधील क्राईम रेट वाढतो, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. आर.आर. पाटील राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा महिला सुरक्षित होत्या. पण सध्या नागपूर क्राईम कॅपिटल झाले आहे.
दरम्यान, अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवार यांनी त्यांचा फोटो वापरू नये म्हणून सांगितलं होतं. त्यानंतर अजित पवार गट आपल्या कार्यक्रमात शरद पवाराच्या फोटोऐवजी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरत आहे. यावर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सध्याचं सरकारमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा फोटो मोठा होत आहे. त्यांची आठवण केली जाते.
कारण हेडगेवारांच्या नावाने मतं मिळत नाहीत, म्हणून यशवंतरावांचे नाव घेतात. चव्हाण साहेबांनी कधीच सुडाचं राजकारण केलं नाही. परंतु त्यांचे नाव घेऊन सध्याच्या सरकारमधील लोकं सुडाचे राजकारण करत आहे, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.