By Editor on Thursday, 30 November 2023
Category: महाराष्ट्र

[maharashtratimes]'या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?',केसरकरांनी जाहीर माफी मागावी,

सुप्रिया सुळे 'त्या' व्हिडिओवरुन संतापल्या

मुंबई : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बीड जिल्ह्यातील कपिलधारा येथे दीपक केसरकर हे एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्याठिकाणी ते माध्यमांसोबत बोलत असताना शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या एका महिलेनं वेबसाईटवरील प्रोसेस कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला. यानंतर संतापलेल्या दीपक केसरकर यांनी संबंधित महिलेला शिक्षक भरतीतून नाव डिसक्वालिफाय करु असा इशारा दिला. या व्हिडिओवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना आवरावे, अशी विनंती केली आहे. तर सबंधित मंत्र्यांनी त्या मुलीची जाहीर माफी मागावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.

सुप्रिया सुळे यांचं ट्विट

महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षकभरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला 'डिसक्वालिफाय' करण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून 'या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?' असा प्रश्न पडतो. एक ज्येष्ठ मंत्रीमहोदय आजकाल जाहीर सभांतून जनतेला धमकावताना दिसतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची आहे? त्यांच्या जे मनात आहे तोच जनतेच्या दरबारात त्यांचा फैसला ठरलेला आहे. तोवर मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, ही विनंती. यासोबतच दीपक केसरकर यांनी तातडीने संबंधित मुलीची जाहीर माफी मागितली पाहिजे,असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी या ट्विटच्या माध्यमातून मंत्री दीपक केसरकर यांचं नाव घेत तर छगन भुजबळ यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यांनी 'या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय? असा सवाल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या सर्वाला मूक संमती आहे का असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी केला.दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी दीपक केसरकर यांनी तातडीनं संबंधित महिलेची तातडीनं जाहीर माफी मागावी, असं म्हटलं आहे. या प्रकरणी दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.​

Supriya Sule Attack on Deepak Kesarkar; 'या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?', केसरकरांनी जाहीर माफी मागावी, सुप्रिया सुळे संतापल्या, मुख्यमंत्र्यांना थेट सवाल | Maharashtra Times

Leave Comments