By Editor on Monday, 16 September 2024
Category: महाराष्ट्र

[ABP MAJHA]नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल

सुप्रिया सुळेंचा फुल्ल पाठिंबा

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शनिवारी नागपूरमधील एका कार्यक्रमात आपल्याला विरोधी पक्षातील एका नेत्याने पंतप्रधानपदाची (PM) ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. यावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

नितीन गडकरी यांनी नागपूरमधील कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, काही दिवसांपूर्वी एक घटना अचानक घडली. मी या घटनेमधील नेत्याचे नाव सांगत नाही. पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण त्यावर मी त्यांना विचारलं की, तुम्ही मला पंतप्रधानपदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी तो पाठिंबा का घ्यावा? मी संबंधित नेत्याला स्पष्टपणे सांगितले की, पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी या तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारण करणार नाही, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. 

गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल

 सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी यासंदर्भात ऐकलं नाही. नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्याची देशाला गरज आहे. ते जर प्रधानमंत्री झाले तर आम्हाला आनंद होईलच. एक मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर बसेल. नितीन गडकरी यांचे कर्तृत्व सुद्धा खूप मोठे आहे आणि ते गलिच्छ राजकारण करत नाहीत. सत्तेसाठी त्यांनी कधी आपली भूमिका बदलली नाही ही त्यांची खासियत आहे. त्यांचं खूप मोठं मन आहे. विकासात ते कधीच राजकारण करत नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

केजरीवालांच्या राजीनाम्यावरून सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

​दरम्यान, आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे कारण एजन्सीचा गैरवापर यामध्ये झाला आहे. आयकर विभाग, सीबीआय आणि ईडी याचा गैरवापर होतो हे सातत्याने आम्ही बोलतो. एकतर याची भीती दाखवायची नाहीतर वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं. हा देश अदृश्य शक्तींच्या मनमानीने चालत आहे. पण हा देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच चालणार आहे. म्हणून जे आधी मोदी सरकार होतं ते आता एनडीए सरकार झाले आहे. अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल चुकीची लाईन सरकारने घेतली. केजरीवाल हे देशाचे मोठे नेते आहेत. हा विषय संविधानासाठी खूप महत्त्वाचा होता. चुकीच्या पद्धतीने त्यांना अटक झाली. त्यंची शुगर इतकी वाढली की, त्यांना दोनदा चक्कर आली. पण हे असंवेदनशील सरकार आहे. अतिशय गलिच्छ राजकारण भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष करत आहेत. केजरीवाल हे लादलेले नेते नाहीत किंवा कॉम्प्रोमाइज करणारे नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Supriya Sule Says We will be happy if Nitin Gadkari becomes the Prime Minister Maharashtra Politics Marathi News | Supriya Sule : नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल; सुप्रिया सुळेंचा फुल्ल पाठिंबा

Leave Comments