By Editor on Monday, 30 October 2023
Category: महाराष्ट्र

[loksatta]“घरात घुसून गोळीबार करण्याइतपत…”; सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाल्या…

पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात एका तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास हल्लेखोराने घरात घुसून परप्रांतीय तरुणाला गोळ्या घातल्या आहेत. यामध्ये संबंधित तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पुण्यात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र सोडलं आहे.

'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या, "घरात घुसून गोळीबार करण्याइतपत गुन्हेगार निर्ढावले आहेत. पुण्यात एका व्यक्तीच्या घरात घुसून बेछूट गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आली. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीने थैमान घातले आहे." "राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. जे 'पार्ट टाईम' गृहमंत्री महोदय (देवेंद्र फडणवीस) आहेत, त्यांना आमदार फोडाफोडी आणि इतर राजकारण करण्यातून वेळ मिळत नाही. त्यामुळे गुन्हेगारांचे फावले असून ते राजरोसपणे गुन्हे करत आहेत. एकीकडे 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमापूर्वी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी प्रचंड तत्परता दाखविणारे गृहखाते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे" अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी टीकास्र सोडलं आहे.

नेमकी घटना काय आहे?

पुण्यातील घोरपडे पेठेत मध्यरात्री एका सदनिकेत शिरुन परप्रांतीय कामगारावर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात संबंधित तरुणाचा मृत्यू झाला आहे. पसार हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून खुनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. अनिल साहू (वय ३५, रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ) असे मृत पावलेल्या कामगाराचे नाव आहे. साहू हा मूळचा बिहारमधील असून तो कारागीर आहे. तो आपल्या पत्नीसह खडकमाळ आळीत सिंहगड गॅरेज चौक परिसरात एका सोसायटीत भाडेतत्वावर सदनिका घेऊन राहत आहेत. मध्यरात्री दोनच्या सुमारास हल्लेखोराने सदनिकेत शिरुन साहूवर गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या साहूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

"घरात घुसून गोळीबार करण्याइतपत..."; सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाल्या... | supriya sule on pune murder case firing on man devendra fadnavis | Loksatta

Leave Comments