By Editor on Thursday, 31 August 2023
Category: महाराष्ट्र

[mymahanagar]परिस्थिती हळूहळू आणखी भीषण होईल

सुप्रिया सुळेंकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंबई : पावसाने ओढ दिल्याने राज्यातील अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती हळूहळू आणखी गंभीर होईल, असा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे.

यंदा आधीच बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात मान्सून उशिराने दाखल झाला होता. त्यामुळे पेरण्याही उशिराने झाल्या. त्यानंतर काही प्रमाणात पाऊस बरसला. मात्र, गेल्या महिन्याभराहून अधिक काळापासून पावसाने पाठ फिरवली आहे. सुकत चाललेली पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. राज्यात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पावसाची तब्बल 22 टक्के तूट असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुन्हा एकदा नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

यंदा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र पावसाने संपूर्ण देशात कहर केला होता. धो-धो बरसलेल्या पावसाने काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण केली. त्यांनतर गायब झालेला पाऊस पुन्हा परत फिरण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ 42 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये मराठवाड्याची स्थिती विदारक आहे. कारण, मराठवाडा विभागात केवळ 28 टक्केच पाऊस पडला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात 36 टक्के पाऊस पडला असून, राज्यातील 15 जिल्हे दुष्काळाच्या वाटेवर आहेत.

या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे. गेल्या काही वर्षांत प्रथमच संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. याचा शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. धरणांतील पाणीसाठा अतिशय जपून वापरण्याची गरज आहे. काही धरणांनी तर तळ गाठला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ही सगळी परिस्थिती दुष्काळाकडे इशारा करीत आहे. ही परिस्थिती हळूहळू आणखी भीषण होईल असे दिसते. हे लक्षात घेता शासनाने दुष्काळ जाहीर करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा छावण्यांच्या माध्यमातून चारा पुरविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची शासनाने तातडीने अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

The situation will gradually worsen, Supriya Sule demands to declare drought msj

Leave Comments