By Editor on Friday, 20 October 2023
Category: महाराष्ट्र

[loksatta]“ललित पाटील प्रकरणावर बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील”

फडणवीसांच्या विधानावर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या…

राज्यातील ड्रग्ज रॅकेट चालवण्याचा आरोप असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी बुधवारी ( १८ ऑक्टोबर ) अटक केली. अटकेनंतर ललित पाटीलनं धक्कादायक दावा केला होता. मी ससून रूग्णालयातून पळून गेलो नाही, तर मला पळवलं होतं. मी सर्व गोष्टींचा खुलासा करणार, असं ललित पाटीलनं म्हटलं होतं. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिला आहे.

"काही गोष्टींची मला माहिती मिळाली आहे. मी लगेच सांगू शकत नाही. योग्यवेळी तुम्हाला सर्व सांगेन. पण, मोठे धागेदोरे बाहेर काढणार आहोत. ललित पाटील काय बोलता, यापेक्षा जे धागेदोरे बाहेर समोर येणार आहेत, त्यातून बोलणाऱ्यांची तोंडं बंद होतील," असं फडणवीसांनी म्हटलं होतं.

यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना सुनावलं आहे. "देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना ललित पाटील पळून गेला. मग, तुम्ही ललित पाटीलला कसं काय पळून जाऊन दिलं? याची जबाबदारी कोण घेणार? गृहमंत्री म्हणतात 'सगळ्यांना उघड करणार…' हा माणूस पळूनच कसा गेला, याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला हवं. देवेंद्र फडणवीस उत्तर देतील, याची वाट बघतोय."

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारेंनी भाष्य केलं आहे. "देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की, बोलणाऱ्यांची तोंडं बंद होतील. हा इशारा आहे की धमकी आहे. तोंडं बंद कराल म्हणजे काय कराल. संपवून टाकाल का? की मलिक, देशमुख आणि राऊतांना अडकवलं तसं मला अडकवाल. अडकवाल तर कशात अडकवाल. आयुष्यभर संवैधानिक भाषा सांगत आली आहे. आयुष्यभर कायदे आणि कलमं याशिवाय काहीही बोललेले नाही. तुम्ही मला अडकवलं तरी कशात अडकवाल?" असा सवाल सुषमा अंधारेंनी फडणवीसांना विचारला आहे.

"ललित पाटील प्रकरणावर बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील", फडणवीसांच्या विधानावर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या... | supriya sule on devendra fadnavis over lalit patil drug case | Loksatta

Leave Comments