By Editor on Tuesday, 16 May 2023
Category: महाराष्ट्र

[loksatta]चिपी विमानतळाच्या नामांतराबाबत सुप्रिया सुळे यांची ज्योतिरादित्य सिंधियांकडे मागणी, म्हणाल्या…

सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे लोकार्पण ९ ऑक्टोबर २०२१ ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डानमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं होतं. त्यानंतर वर्षभराने डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानतळाला स्वातंत्र्यसेनानी आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून नावलौकिक मिळवलेले दिवंगत बॅ. नाथ पै यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विमानतळाच्या नामकरणाचा चेंडू आता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या कोर्टात गेला आहे.

दरम्यान, चिपी विमानतळाच्या नामांतराबाबत मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ही मागणी लावून धरली आहे. खासदार सुळे यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना विनंती केली आहे की, या नामांतराच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा.

सुप्रिया सुळे यांनी यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांना एक निवदेनही दिलं आहे. हे निवेदन खासदार सुळे यांनी ट्विटरवर शेअर केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, चिपी, सिंधुदुर्ग येथील विमानतळास थोर स्वातंत्र्यसेनानी बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी आहे. बॅ. नाथ पै यांचे जन्मगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हे आहे. स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिल्यानंतर त्यांनी एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून आपला ठसा उमटविला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. 

​खासदार सुळे यांनी म्हटलं आहे की, बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव सिंधुदुर्गधील विमानतळास देऊन आपल्या भूमीपुत्राच्या स्मृती जतन करणं सिंधुदुर्गवासियांना शक्य होईल. याबाबतचा ठराव महाराष्ट्र शासनाने केला असून १ फेब्रुवारी २०२३ रोजी तो केंद्र सरकारकडे देखील पाठविला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया जी आपण कृपया या प्रस्तावावर सकारात्मक विचार करुन तातडीने निर्णय घ्यावा ही नम्र विनंती.

Leave Comments