By Editor on Tuesday, 31 October 2023
Category: महाराष्ट्र

[sarkarnama]धर्मेंद्र प्रधानांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या 'त्या' विधानावरून सुप्रिया सुळेंचं भाजपवर टीकास्त्र, म्हणाल्या...

Supriya Sule and Dharmendra Pradhan : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ''समर्थ रामदास नसते, तर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते,'' असं विधान केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. त्यांच्या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात आता खासदार सुप्रिया सुळे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे.

सुप्रिया सुळे म्हणतात, ''मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार 'तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचादेखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही.''

याचबरोबर, ''असे असताना भाजपचे नेते वारंवार अशी दिशाभूल करणारी निखालस खोटी विधाने करून नेमकं काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वीही भाजपच्या नेत्यांनी या पद्धतीची विधाने करून शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या या विधानाचा निषेध. भाजपने याबद्दल जनतेची माफी मागितली पाहिजे,'' असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

समर्थ रामदास नसते तर छत्रपती शिवाजी महाराज बनले नसते, शिवाजी बनवण्याच्या फॅक्टरीचे सर्व समर्थ गुरू येथे बसले आहेत, असं वक्तव्य धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, यामुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Supriya Sule news : धर्मेंद्र प्रधान यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या 'त्या' विधानावरून सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र, म्हणाल्या... Supriya Sule criticizes BJP over Dharmendra Pradhans statement regarding Shivaji Maharaj and Samarth Ramdas msr87

Leave Comments