बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अद्यापही सातवा आरोपी सापडलेला नाही. तसंच, देशमुख कुटुंबीयांकडून सातत्याने न्यायाची मागणी होत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला जातोय. आंदोलनानंतरच आरोपींना अटक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आता अन्नत्यागाचा इशारा दिला आहे. राज्यात बीडमध्ये एवढ्या घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी, आई आणि मुलीशी संवाद साधला. तसंच, गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या गावातील समस्या जाणून घेतल्या. यानंतर सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.