By Editor on Saturday, 07 December 2024
Category: महाराष्ट्र

[Dainik Prabhat]फडणवीस मुख्यमंत्री होताच सुप्रिया सुळेंनी करून दिली त्या आश्वासनाची आठवण

आचारसंहिता काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने निवडणूक संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता निवडणूक आटोपली असल्याने हप्त्याबाबत बहिणींमध्ये उत्सुकता लागली आहे. विधानसभा निवडणुकीत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना महत्त्वपूर्ण ठरल्याने, महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे.आता या लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून तो खात्यात कधी जमा होणार, याची चर्चा आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलै 2024 पासून सुरू केलेल्या या योजनेंतर्गत ऑक्टोबर 2024 पर्यंत शेकडो महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेस पात्र ठरल्या आहेत.

पात्र ठरलेल्या बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट महिन्याचा पहिला अन् दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला.तसेच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खात्यात जमा केले होते. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्यांचे साडेसात हजार जमा झाले आहेत.सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारांवरून दोन हजार 100 रूपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. आता महायुतीचे सरकार आल्याने या योजनेचा हप्ता 2100 रूपये बँक खात्यात कधी जमा होणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणीला लागली आहे.दरम्यान, आज खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीला त्याच आश्वासनाची आठवण करुन दिली. "देवेंद्रजी म्हणाले की, लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये देणार आहोत. नवीन वर्ष सुरु होतय. डिसेंबर किंवा जानेवारी, डिसेंबर महिना सुरु झालाय, पण शक्य असेल, तर डिसेंबरपासूनच किंवा 1 जानेवारी 2025 पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात महिना 2100 रुपये जमा करा. आम्ही तर म्हणतो 3 हजार रुपये द्या, कारण आम्ही सत्तेवर आलो असतो, तर महिना 3 हजार रुपये देणार होतो" असं सुप्रिया सुळे म्हणाल्या

Supriya Sule : फडणवीस मुख्यमंत्री होताच सुप्रिया सुळेंनी करून दिली 'त्या' आश्वासनाची आठवण, थेट म्हणाल्या....

Leave Comments