By Editor on Wednesday, 05 November 2025
Category: महाराष्ट्र

[Etv Bharat]महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट

कुटुंबाची एसआयटीची मागणी मान्य करा - सुप्रिया सुळेंची मागणी

बीड : फलटणच्या महिला डॉक्टरने आत्महत्या (Phaltan Doctor Suicide Case) केली होती. डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर आरोप केले होते. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय अनेक नेत्यांनी व्यक्त केलाय. तसंच या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी कुटुंबीय करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज बीडमध्ये पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना पीडितेला न्याय देण्याची मागणी केली.

डॉक्टरकुटुंबाची एसआयटीची मागणी मान्य करावी : फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एसआयटी स्थापनबाबत जे बोलले त्याबद्दल मी आभार मानते. पण जेव्हा ऑर्डर पाहिली तेव्हा ती पूर्णपणे एसआयटी नसल्याचा समज झालेला आहे. त्यामुळं माझी हात जोडून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, कुटुंबाची एसआयटीची मागणी मान्य करावी. त्या एसआयटीमध्ये निवृत्त सरन्यायाधीश यांचा समावेश करावा आणि पूर्णपणे पारदर्शकपणे, कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता पीडित कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या प्रकरणात आम्ही स्वत: पाठपुरावा करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. 

"महिला डॉक्टरआत्महत्या प्रकरणात सरकारकडून जी अतिशय असंवेदनशील आणि 'गलिच्छ' विधाने केली जात आहेत, ती दुर्दैवी आहेत. फलटणची डॉक्टर ही महाराष्ट्राची लेक आहे आणि तिला न्याय मिळालाच पाहिजे. जोपर्यंत कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही." 


सुप्रिया सुळे, खासदार

महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट; कुटुंबाची एसआयटीची मागणी मान्य करा - सुप्रिया सुळेंची मागणी

Leave Comments