By Editor on Thursday, 16 February 2023
Category: महाराष्ट्र

[Sakal]सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील ; सुप्रिया सुळे

 परभणी : महिलांवरील अन्याय-अत्याचार दूर करणे, महिलांमध्ये कायदेविषयक जाणीव जागृती करणे आणि आत्मनिर्भरता यशस्वी करणे, मॉलमध्ये स्थानिक महिला बचत गटांची उत्पादने विक्री करणे यासह सामाजिक प्रश्नांची चर्चा व सोडवणूक करण्यासाठी यशवंतराव चव्हाण केंद्र प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही या केंद्राच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे मंगळवारी (ता. १४) दिली.

शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात परभणी शाखेच्या निमंत्रित सदस्यांशी त्यांनी संवाद साधला. या बैठकीस सल्लागार कांतराव देशमुख, सोपानराव अवचार, उपाध्यक्ष भावना नखाते, प्रेक्षा भांबळे, डॉ. संगीता आवचार, मंगल पांडे, श्री. मुंडे, डॉ. अशोक जोंधळे, त्र्यंबक वडसकर, अरुण चव्हाळ, विठ्ठल भुसारे, सुरेंद्र रोडगे, प्रवीण कापसे, डॉ. जयंत बोबडे, अनिकेत सराफ आदींची उपस्थिती होती. निमंत्रित सदस्यांनी काही मौलिक सूचनाही केल्या.

त्या अनुषंगाने खासदार सुळे यांनी मराठवाड्यातील महाविद्यालयीन विशेषतः अकरावी व बारावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण ९० टक्के असणे महत्त्वाचे आहे आणि महाविद्यालयांनी हा मुद्दा गांभीर्याने घेऊन शिक्षणात विद्यार्थ्यांची गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे, असे सूचित केले. आरोग्य, शिक्षण या क्षेत्रावर अपेक्षित निधी व अंमलबजावणी व्हावी यासाठीही सेंटर प्रयत्न करते.

कस्तुरबा बालिका विद्यालयातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थिनींना शासनाने क्रमिक अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके मोफत द्यावीत, तशी मागणी शिक्षण अधिकारी यांनी शासनाकडे नोंदवावी. स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करून समाजासाठी त्याचा फायदा व्हावा. कृषी मंचच्या अनुषंगाने झालेली कामे चांगली आहेत.

आणखी शेतकरी उत्पादक व ग्राहक यांना एकत्र करून शेती उत्पादने विक्री व्हावी, शेतीतील येणारी नवीन पद्धती व तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचा अभ्यास या अनुषंगानेही कामे व्हावी, असेही सुळे यांनी सांगितले. सुमंत वाघ यांनी सूत्रसंचालन केले.

व्हावी एक गाव एक स्मशानभूमी

​परभणी जिल्ह्यातील झरी या गावची 'एक गाव एक स्मशानभूमी' ही सामाजिक चळवळ सार्वत्रिक व्हावी, याकडेही खासदार सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधले. मुलांचा क्रीडा विकास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मूलभूत आहे, यासाठीचे उपक्रमही राबवले जावेत.

वर्षभरातून मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातील चव्हाण सेंटरच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक व विभागीय बैठक आयोजित करून, एकमेकांची ओळख व कार्याचा अनुभव यावा यासाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Parbhani : सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील ; सुप्रिया सुळे Parbhani social problems solution Striving Supriya Sule | Sakal

Leave Comments