By Editor on Thursday, 13 April 2023
Category: महाराष्ट्र

[Loksatta]“शरद पवारांच्या विधानावर १० दिवस चर्चा होते, मग लोक म्हणतात, अरेच्च्या…”

सुप्रिया सुळेंची खोचक प्रतिक्रिया!

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेपीसीसंदर्भात घेतलेल्या एका भूमिकेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न चालवले असताना दुसरीकडे राहुल गांधींनी अडाणी प्रकरणी केलेल्या जेपीसीच्या मागणीशी पवारांनी असहमती दर्शवली आहे. त्यांच्या याच विधानावरून विरोधकांमध्ये फूट पडल्याचं बोललं जात असून शरद पवारांच्या वक्तव्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. त्यांच्या याच भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

काय म्हणाले शरद पवार?

​अदाणींची चौकशी व्हायला हवी, हे मान्य करतानाच ती चौकशी जेपीसीमार्फत न करता सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीमार्फत व्हायला हवी, असं शरद पवार म्हणाले. जेपीसीमध्ये सत्ताधाऱ्यांचे सदस्य जास्त असल्यामुळे न्यायालयीन समिती जास्त योग्य राहील, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी गेल्या दोन महिन्यांपासून घेतलेल्या भूमिकेपासून त्यांनी फारकत घेतल्याचं बोललं जात आहे.

या पार्श्वभूमवीर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीव्ही ९ वर बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. "गेल्या महिन्याभरापासून जेपीसीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची हीच भूमिका आहे. संजय राऊतांचीही सध्या चौकशी चालू आहे. राज्य सरकारने त्यावर समिती नेमली आहे. पण त्याचे अध्यक्ष कोणत्या पक्षाचे आहेत? त्या कमिटीत कुठल्या पक्षाचे लोक जास्त आहेत? कमिटीचे अध्यक्ष सत्तेतले, कमिटीतले लोकही सत्तेतलेच जास्त आहेत", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"शरद पवार काय म्हणाले हे कुणी ऐकूनच घेत नाही"

​"शरद पवार काय म्हणाले हे सगळे ऐकूनच घेत नाहीत हीच समस्या आहे. शरद पवार एक गोष्ट बोलतात. त्यावर १० दिवस चर्चा होते. त्यानंतर लोक म्हणतात अरेच्च्या, त्यांना 'असं' म्हणायचं होतं. गेल्या ६० वर्षांचा इतिहास अभ्यासला तर हे लक्षात येईल. त्यामुळे घाईघाई न करता त्यांची मुलाखत शांतपणे ऐकली, वक्तव्य समजून घेतलं तर त्यांना काय म्हणायचंय हे लक्षात येईल", असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

"शरद पवारांच्या विधानावर १० दिवस चर्चा होते, मग लोक म्हणतात, अरेच्च्या...", सुप्रिया सुळेंची खोचक प्रतिक्रिया! | ncp supriya sule clarifies on sharad pawar jpc stand on adani issue | Loksatta

Leave Comments