By Editor on Tuesday, 18 July 2023
Category: महाराष्ट्र

[लोकसत्ता]शरद पवारांचा ४५ वर्षांपूर्वीचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतानाचा फोटो ट्वीट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “झंझावात..”

सुप्रिया सुळे यांनी केलेलं हे सूचक ट्वीट चांगलंच चर्चेत आहे.

महाराष्ट्राचं राजकारण सध्या वेगवेगळी वळणं घेताना दिसतं आहे. अशात मागच्या १५ दिवसांपासून चर्चेत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालंय. हे बंड दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर दस्तुरखुद्द अजित पवारांनी केलं आहे. बंडानंतर त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांसह गेलेल्या इतर नेत्यांचंही खातेवाटप झालं. अशात मागचे तीन दिवस अजित पवार गटाचे नेते आणि शरद पवार यांच्या भेटी होत आहेत. या सगळ्याची चर्चा सुरु असतानाच सुप्रिया सुळे यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. 

काय म्हटलं आहे सुप्रिया सुळेंनी ट्वीटमध्ये?

​आदरणीय पवार साहेबांनी ४५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी ते केवळ ३७ वर्षांचे होते. महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची नोंद राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री अशी झाली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा झंझावात तेंव्हा जसा होता तसाच किंवा त्याहीपेक्षा जास्त आता देखील आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनीही हा फोटो रिट्विट करत व्यक्त केल्या भावना

वयाच्या ३७ व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या आदरणीय शरद पवार साहेबांचा उत्साह व ऊर्जा वयाच्या ८३ व्या वर्षीही अगदी तशीच आहे. अशा लोकनेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका तरुणाला मिळतेय, हे माझं भाग्यच!​

सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांचा उल्लेख झंझावात असा केला आहे. त्यामुळे आता शरद पवार नवी कुठली खेळी करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अजित पवार यांनी शुक्रवारपासून सलग तीन दिवस शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यानंतर आज शरद पवार हे विरोधकांच्या बैठकीला बंंगळुरु या ठिकाणी गेले आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात जेव्हा उभा दावा झाला तेव्हा सातत्याने त्यांच्या वयाचा उल्लेख करण्यात आला. शरद पवार यांचं वय ८३ आहे आता त्यांनी थांबलं पाहिजे आणि आशीर्वाद दिला पाहिजे असंही बोललं गेलं. आता याच वयाचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना झंझावात असं म्हटलं आहे. शरद पवार हे जेव्हा विकेट काढतात तेव्हा १५ दिवसांनी कळतं या आशयाचं एक ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनीही केलं होतं. अशात महाराष्ट्राच्या राजकारणात नवा काही ट्विस्ट येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.​

शरद शरद पवारांचा ४५ वर्षांपूर्वीचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतानाचा फोटो ट्वीट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, "झंझावात.." | Supriya Sule Tweets Sharad pawar 45 Years old Photo and Said this | Loksatta

Leave Comments