पुणे : आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांना झापल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दादांवर चहूबाजूने टीका होत आहे. तहसीलदारांच्या आदेशानंतर उत्खनन रोखण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी करमाळा तालुक्यातील गावात कारवाई सुरू केली होती. त्या कारवाईनंतर आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या सगळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एका तहसीलदाराला, तलाठीला सोलापूर जिल्ह्यात मारलं जातं ते मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. त्याच्यावर ऍक्शन व्हायला नको का? हे मोठे विषय नाहीत का? सोलापूरची आयपीएस महिला अधिकारी या लेकीचा मला सार्थ अभिमान आहे, ती तिच्या मेरिटवर जाऊन काम करत आहे. एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव म्हणायचं आणि दुसरीकडे लेकींना अशी गलिच्छ वागणूक द्यायची हे आपल्याला शोभणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
तर, एक आयपीएस अधिकारी जी तिच्या मेरीटवर पास झालेली आहे, ती निष्ठेने तिचं काम करत आहे. मात्र तिच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं हे दुर्दैव आहे. बाकीचे लोक कॉपी करून पास झाले असतील पण आम्ही कॉपी करून पास झालो नाही. ती महिला देशात 335 रँक घेऊन इथे आलेली आहे, कोणत्या परिवारवादातून नाही, असं म्हणतं सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
दरम्यान, कुठे बेकायदेशीर काम सुरू आहे तिथे पोलिसांनी जायचं नाही का? आता तुम्ही पोलिसांना पण जाब विचारणार का? जिल्हाधिकाऱ्यांचं स्टेटमेंट आहे जी कारवाई झाली ती योग्यच आहे. जर इमानदार लोकांना या सरकारने त्रास दिला तर आम्ही रस्त्यावर उतरू हे जन आंदोलन असेल. या सगळ्यांची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील तहसीलदारांच्या आदेशानंतर उत्खनन रोखण्यासाठी अंजना कृष्णा यांनी कारवाई सुरू केली होती. ही कारवाई रोखण्यासाठी उत्खनन करत असलेल्या कार्यकर्त्यांनी आपले नेते असलेल्या अजित पवारांना फोन लावला. यावेळी फोनवर बोलत असताना आयपीएस अंजना कृष्णा यांनी मला दुसऱ्यांच्या फोनवर नाही तर माझ्या फोनवर संपर्क साधायला हवा होता, असे थेट सांगितले. यानंतर वैतागलेल्या अजित पवारांनी अंजना कृष्णा यांचा मोबाइल नंबर मागितला आणि त्यांना व्हिडीओ कॉल केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांवर टिकेची झोड उठवली जात आहे. त्यात आता सुप्रिया सुळे यांची देखील भर पडली आहे.