सुप्रिया सुळे यांना नेमकं काय सूचवायचं आहे?
मनोज लेले, Tv9 मराठी, सिंधुदुर्ग | 27 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सिंधुदुर्गात भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी नोटबंदीचा मुद्दा उपस्थित करत मंत्री दीपक केसरकर यांचं नाव न घेता निशाणा साधला. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी आपण दिल्लीत जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोकणातील एका बड्या नेत्याची तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी नोटबंदीचादेखील मुद्दा उपस्थित केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. सुप्रिया सुळे यांना नेमकं काय बोलायचं आहे, पैशांवरुन त्यांना नेमकं काय सुचवायचं आहे? अशी चर्चा आता रंगली आहे.
"मी जन्मापासून सिंधुदुर्गात येत आहे. माझ्या आई-वडिलांना कोकणातला हा भाग सर्वात जास्त आवडतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रायगड जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाला गेले आहेत. तर मी संघटनेच्या कामाला आलेय. कोकणातल्या रस्त्याचा प्रश्न अजून सुटत नाही. कोकणातल्या रस्त्यांवर आता कौलं लावा", असा टोला सुप्रिया सुळे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून लगावला.
सुप्रिया सुळे दिल्लीत जावून मोदींना तक्रार करणार
"महाविकास आघाडीमध्ये 2024 मध्ये सावंतवाडी मतदारसंघासाठी नक्कीच मागणी केली जाईल", असं सुप्रिया सुळे म्हणाले. "कोणाच्या जॅकेटमधून पैसे कसे येतात? पंतप्रधान नरेद्र मोदींनी तर नोटबंदी केलीय. मला मोदींना दिल्लीत जाऊन सांगावं लागेल की कोकणात कॅश चालू आहे. काहीतरी गडबड आहे", असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मंत्री दीपक केसरकर यांना टोला लगावला.
'मोदी हेडलाईन करण्यासाठी शरद पवारांवर टीका करतात'
"माझं भांडण फक्त भाजपशी आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भाजपला भ्रष्ट जनता पार्टी म्हणतात. भाजप भ्रष्ट जुमला पार्टी आहे. पंतप्रधान या पदाला मोठा मान आहे. भारतातल्या शेतकऱ्यांसाठी शरद पवार यांनी काय नाही केलं ते सांगा. कुठले मोदी खरे आहेत? शरद पवारांचे कौतुक करणारे की काल बोलणारे? महाराष्ट्रात आल्यावर टीका कोणावर करणार? तर शरद पवार यांच्यावर? हेडलाईन करण्यासाठी शरद पवार यांच्यावर टीका करतात. टीका करून प्रश्न सुटत नाहीत", अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
'शिंदे सरकार दारूची दुकान वाढवते'
"सर्वात जास्त भ्रष्टाचार हा भाजपमध्ये आहे. शिंदे सरकार दारूची दुकान वाढवते. शिक्षण खात्याचा दर आठवड्याला एक जीआर निघतो. शिक्षणाला सरकारने हलकं फुलकं घेतलंय. शाळा कमी करून दारूची दुकानं वाढवायची", असं धोरण सुरु असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
ठाकरे यांच्याकडून पक्ष काढून घ्यायचा त्यांना काय अधिकार?'
हळू बोलण्यावरून सुप्रियाताई सुळे यांनी दीपक केसरकर यांची नक्कल केली. "पाठीत खंजीर खुपसल्यावर हळू बोलणारा काय होता हे समजतं. मुख्यमंत्रीपद तुम्ही ओरबाडून घेतलं. शिवसेना मोठी झाली याचा आम्हाला आनंद आहे. त्यांना काय अधिकार ठाकरे यांच्याकडून पक्ष काढून घ्यायचा?", असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. "सर्वात मोठी ताकद इमानदारीची आहे. दहा वर्ष तुम्ही एक एमआयडीसी आणू शकले नाहीत. पीआरओ पाहिजे की आमदार पाहिजे?" असादेखील सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
'आमदार पळवायला पैसे आहेत, पण…'
"घर फोडायला पैसे आहेत. आमदार पळवायला पैसे आहेत. पण हिरे बाजार बाहेर जाऊ नये म्हणून पैसे नाहीत. आता एक जरी उद्योग बाहेर गेला तर मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही", असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.
'फडणवीस यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं'
"राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरी निवडणुकीच्या आधी रेड पडते. याचा अर्थ भाजप घाबरली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. 105 आमदार निवडून आले. फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं नाही, उपमुख्यमंत्री केलं. आणखी एक उपमुख्यमंत्री आणि त्यांना अडीच मार्कांवर आणलं. दहा पैकी अडीज मार्क म्हणजे नापास झाले", असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.