By newseditor on Friday, 31 August 2018
Category: महाराष्ट्र

‘सनातन’वरुन लक्ष विचलित करण्यासाठी विचारवंतांना अटक: सुप्रिया सुळे

कुठली पुस्तक वाचायची हे पण सरकारने ठरवायचे का?, सुप्रीम कोर्टाने पोलीस आणि राज्य सरकारला विचारवंतांच्या अटकेवरून फटकारले यासाठी मी कोर्टाचे आभार मानते-सुप्रिया सुळे

‘सनातन’ या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेवरील कारवाईवरुन लक्ष विचलित करण्यासाठी डाव्या विचारधारेच्या विचारवंतांना अटक करण्यात आली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कुठली पुस्तक वाचायची हे पण सरकारने ठरवायचे का?, असा सवालही त्यांनी विचारला.

पुणे पोलिसांनी नक्षली समर्थक असल्याच्या संशयातून देशाच्या विविध भागांमधून पाच जणांना नुकतीच अटक केली होती. या अटकेवरुन सुप्रीम कोर्टाने पोलिसांना फटकारले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी पुण्यात भाजपा सरकारवर टीका केली. ‘सनातन’वरच लक्ष विचलित करण्यासाठीच डाव्या विचारांच्या विचारवंतांना अटक करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. कुठली पुस्तक वाचायची हे पण सरकारने ठरवायचे का?, सुप्रीम कोर्टाने पोलीस आणि राज्य सरकारला विचारवंतांच्या अटकेवरून फटकारले यासाठी मी कोर्टाचे आभार मानते, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी पुण्याजवळील बोपदेव घाटात खड्डयासोबत सेल्फी घेतला. राज्यातील एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डा नाही. वाढते अपघात, त्यामुळे हकनाक गेलेले बळी याला जबाबदार कोण? पारदर्शक कारभाराचे दावे करणाऱ्या या सरकारला रस्त्यांची दुरावस्था दाखवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Leave Comments