06.26 AM
नगर - 'राज्यातील मंत्री हेलिकॉप्टमधून फिरतात. अशांना सर्वसामान्यांचे प्रश्न समजत नाहीत. त्यांना हेलिकॉप्टरमधून रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत. सामन्यांना मात्र जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.मुख्यमंत्र्यांनी राज्यातील रस्तादुरुस्तीत लक्ष घालावे,'' असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी भवनात आज झालेल्या मेळाव्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, 'नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी राज्यात दौरे करीत आहे. युवा संवादातून युवतींचे प्रश्न जाणून घेता येतात. कोणत्याही मागणीसाठी लढायचे असते. आत्महत्येमुळे प्रश्न सुटत नाहीत. आत्महत्या करणे चुकीचे आहे. आमच्या सरकारमध्ये एक आत्महत्या झाली, तरी सध्याचे मुख्यमंत्री त्या वेळी राज्य सरकारवर 302 कलम लावण्याची भाषा करीत होते. एक भ्रूणहत्या अथवा एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली तरी सरकारचे ते अपयश असते, हे मी कबूल करते. राज्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक शेतकरी आत्महत्या गेल्या तीन वर्षांत झाल्या आहेत, असे सरकारी आकडेवारीच सांगते. मग आता कोणावर 302 कलम लावायचे?''