By Editor on Sunday, 19 November 2023
Category: महाराष्ट्र

[sakal]डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार

 मुंबई, ता. १७ : यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दर वर्षी 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार' दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना प्रदान करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

डॉ. यशवंत मनोहर यांनी सातत्याने कसदार लेखन करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. समाजातील नाकारलेल्या माणसाच्या जगण्यातला उद्वेग, आशय-अभिव्यक्ती लिखाणात उतरवणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून मनोहरांकडे पाहिले जाते. त्यांच्या 'उत्थानगुंफा' या पहिल्याच कवितासंग्रहाने वाङ्मयजगतामध्ये त्यांची कवी म्हणून ओळख निर्माण झाली. त्यांच्या साहित्यातून मानवतावादी दृष्टिकोन आणि संविधानातील मूल्यजागर अगदी स्पष्टपणे व्यक्त होताना दिसतो.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी कृषी, औद्योगिक, सामाजिक, व्यवस्थापन, प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रामीण, आर्थिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार' दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपये रोख व मानपत्र असे आहे. पुरस्काराची सुरुवात १९९० पासून झाली. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके, ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर, प्रा. एन. डी. पाटील, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असे अनेक मान्यवर या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.


डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार | Sakal

Leave Comments