By Editor on Friday, 26 September 2025
Category: महाराष्ट्र

[ETV Bharat]राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यास दिरंगाई; गरज पडल्यास रस्त्यावर उतरणार, सुप्रिया सुळे यांचा इशारा

 कोल्हापूर : राज्यात सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यात सध्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, त्यासाठी गरज पडल्यास आम्ही रस्त्यावरही उतरु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिला आहे.

सरकारवर केली जोरदार टीका : खासदार सुप्रिया सुळे यांनी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देवीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यातील दिरंगाई, पुण्यासह महाराष्ट्रातील कोलमडलेलं इन्फ्रास्ट्रक्चर, शक्तिपीठ महामार्गासारख्या मोठ्या प्रकल्पांना मिळणारा निधी आणि राज्यात काढावा लागलेला 'संस्कृती बचाव मोर्चा' यावर सुळे यांनी परखड मत व्यक्त केलं.

शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ आणि सरसकट कर्जमाफीची मागणी : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरामुळं शेतकरी हैराण आहे. मे महिन्यात पाऊस सुरू झाल्यापासून आणि जून-जुलैमध्ये अधिवेशनादरम्यान, राज्य सरकारकडे सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.



राष्ट्रवादीच्या खासदारांची अमित शाहांची भेट : राज्यातील महायुती सरकारने ओल्या दुष्काळाच्या या परिस्थितीत काहीही केलेलं नाही. त्यामुळं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 8 लोकसभा खासदारांनी जुलै महिन्यात देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. महाराष्ट्र सरकारला सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली होती. सुप्रिया सुळे यांनी सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप केलाय. यापूर्वी, राज्यात सत्ता मिळाल्यास सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देणारे हेच सरकार आता शेतकऱ्यांना हमीभाव किंवा कर्जमाफी देण्यात अयशस्वी ठरले आहे, असेही त्या म्हणाल्या.

ओला दुष्काळ जाहीर करा : मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा कणा मोडला आहे. अस्मानी संकटाचा सामना करताना शेतकऱ्याला दिलासा मिळावा यासाठी सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली. जर आता सरकारने पाऊल उचलले नाही, तर रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना न्याय देऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सुळे यांनी असंही नमूद केलं की ८० हजार कोटी रुपये खर्च करून नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग करण्यापेक्षा आता एक हजार कोटी रुपये तातडीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिले पाहिजेत.



पुण्यासह महाराष्ट्रातील इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे कोलमडले : पुण्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल खुद्द मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना फोन करून खड्ड्यांबाबत तक्रार केली असल्याचं समोर आलं आहे. सुळे यांनी या प्रश्नाची दखल अनेक वर्षांपासून घेतली जात नसल्याचं सांगितलं. पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडली आहे. त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना, ही बाब जड अंतकरणातून मांडावी लागत आहे. त्यांनी हिंजवडीच्या प्रश्नाचाही यावेळी उल्लेख केला. सुप्रिया सुळे यांनी सरकारवर आरोप केला की, हजारो कोटींच्या मोठ्या प्रोजेक्ट्च्या फायली जलद गतीने हलतात, त्यांच्यासाठी निधी उपलब्ध असतो. मात्र, खरंच गरजेच्या असलेल्या छोट्या कामांकडं दुर्लक्ष केलं जातं. त्यांनी कोल्हापूरसह महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एवढा निधी जाऊनही मोठे खड्डे आहेत आणि अपघातांमध्ये अनेक लोक दगावत आहेत," ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचं खासदार सुळे म्हणाल्या.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यास दिरंगाई; गरज पडल्यास रस्त्यावर उतरणार, सुप्रिया सुळे यांचा इशारा

Leave Comments