देशानं आज प्रगतीची शिखरं पार केली आहेत. अनेक क्षेत्रात आपण जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करीत आहोत. विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार, कृषी अशा अनेक क्षेत्रात आपण देदिप्यमान कामगिरी केली आहे. जगाचं लक्ष आपण वेधून घेतलंय... यासाठी देशातील प्रत्येकानं आपलं योगदान दिलं आहे. याचं कारण म्हणजे या देशवासियांची या देशाप्रती असणारी आपलेपणाची भावना.
ही भावना रुजविण्यात संविधानाचा सर्वात मोठा हात आहे. म्हणूनच संविधानालाच या देशाच्या प्रगतीचा खऱ्या अर्थानं पाया असं म्हटलं तरी ते चुकीचं नाही. समाजातील सर्वांना समान न्याय देणाऱ्या या संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात संविधान स्तंभ उभारणीसारखा एक अभिनव प्रयोग करण्याचं ठरवलं. मतदारसंघातील सार्वजनिक ठिकाणी सध्या हे स्तंभ आकार घेत आहेत. लोकशाही व्यवस्थेप्रती आदर, प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी उचललेलं हे एक छोटं पाऊल आहे. शिवाय या संविधानाच्या तत्वांतून या स्तभांच्या माध्यमातून भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल. लोकशाही व्यवस्थेबद्दलचा विश्वास आणखी दृढ होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.
संविधान स्तंभ कशासाठी हे समजावून घेण्यापुर्वी थोडं इतिहासात डोकावून पाहुयात. हा देश स्वतंत्र होण्यापुर्वी अनेक राजेरजवाडे, संस्थानिकांच्या ताब्यात होता. स्वातंत्र्यचळवळीच्या माध्मयातून राष्ट्रीयत्वाची भावना ठिकठिकाणी रुजलेली होती. ब्रिटीशांपासून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशातील प्रत्येकानं आपापल्या परीने योगदान दिले होते. तेंव्हापासूनच हा देश माझा आहे आणि या देशातील प्रत्येक व्यवस्थेत माझा वाटा आहे, ही भावना वाढीस लागली होती.
आपण १५ ऑगस्ट १९४७ साली ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर या भावनेला व्यावहारीक रुप देण्यासाठी म्हणजे या देशाचा कारभार चालविण्यासाठी एका सक्षम व्यवस्थेची आवश्यकता होती. लोकशाही प्रणालीच्या माध्यमातून ही व्यवस्था या देशात रुजली, सक्षम झाली. लोकशाही व्यवस्थेचा जो वटवृक्ष आज बहरलेला दिसतो त्याच्या मूळाशी येथील संविधानाची तत्त्वे आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने संविधानाची निर्मीती करण्यात आली.
ते देशाला अर्पण करीत असताना २५ नोव्हेंबर १९४९ साली घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत काही मोलाचे सल्ले दिले. ते म्हणाले होते की, “राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे की अशी, की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीतसुद्धा परिवर्तन करायलाच हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल, तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही.” सध्याच्या परिस्थितीत त्यांनी दिलेला इशारा अगदी समर्पक आहे.
त्यानंतर या देशाचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी या देशाने स्वीकारले. पुढे २६ जानेवारी १९५० रोजी हा देश प्रजासत्ताक म्हणजे, लोकांनी लोकांसाठी चालविलेल्या व्यवस्थेचा झाला. समाजातील सर्वात शेवटच्या रांगेतील माणूस देखील संविधानामुळे देशाच्या उभारणीतला समान भागीदार ठरला. आजवरच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होत होते. आता बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक लोकशाही प्रत्यक्षात यावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
संविधानात नमूद असणारे, समानतेचे तत्व शतकांपासून सुरु असणाऱ्या वैचारीक मंथनाचे सार आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेतच स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य आदी कायम करण्याचा उल्लेख आहे. यातील प्रत्येक शब्द लोकशाही व्यवस्थेची ताकद दाखवून देणारा आहे. संविधान स्तंभाची उभारणी करीत असताना आम्ही जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या आहेत. त्यातील एक म्हणजे प्रत्येक स्तंभावर संविधानाची उद्देशिका आम्ही जाणीवपूर्वक लावत आहोत.
या उद्देशिकेची सुरुवातच आम्ही भारताचे नागरीक...(We the People) अशी झालेली आहे. या देशाच्या उभारणीतले समान भागीदार असणारे आम्ही देशाचे सर्व लोक ही घटना देशाला अर्पण करीत आहोत असा भाव यामध्ये आहे. सामूहिक जबाबदारीचे केवढे मोठे तत्त्व संविधानात सामावले आहे, हे यातून दिसून येईल. समाजातील प्रत्येकाला शासनव्यवस्थेत सामावून घेण्याचा हा एवढा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय संविधानाच्या निर्मात्यांनी घेतला होता. गेल्या सात दशकांच्या काळात आपण जी प्रगती केली आहे. त्याला सर्वांनीच हातभार लावला.
संविधानाचे महत्त्व आणखी प्रखर व्हावे, भावी पिढ्यांना त्याची महती कळावी हा संविधान स्तंभ उभारण्या मागचा हेतू आहेच. पण त्याचसोबत अलिकडच्या काळात संवैधानिक संस्थांवर ठराविक प्रवृत्तीच्या व्यक्ती, संघटनांकडून वारंवार हल्ले होत आहेत. संविधानाची तत्त्वे पायदळी तुडविण्याचा, संविधानकर्त्यांचे योगदान नाकारण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. सध्याच्या काळात अशा शक्ती दुर्दैवाने प्रबळ आहेत. त्यांना रोखठोक उत्तर देऊन त्यांच्या दुष्प्रचाराला अटकाव करण्याचे काम संविधान स्तंभांच्या माध्यमातून व्हावे हा हेतू देखील यामध्ये आहे. संविधानस्तंभ ही एक प्रतिकात्मक कृती आहे. संविधानाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत आणखी खोलपर्यंत रुजविण्यासाठी संविधानफेरी, चर्चासत्रे, ध्वनीचित्रफिती यांसारख्या उपक्रम राबविण्याची गरज आहे. यामध्ये शालेय विद्यार्थी, शिक्षक, महिला, समाजातील विचारवंत अशा घटकांना सहभागी करुन घेतल्यास संविधानाचा विचार आणखी खोलपर्यंत झिरपण्यास मदत होईल.
संविधानस्तंभाची उभारणीत भारतीयत्वाचा विचार आहे. आम्ही या देशाचे आणि हा देश आमचा ही भूमिका आणखी प्रखरपणे रुजविण्याचा प्रयत्न आहे. हे स्तंभ सार्वजनिक उद्याने, सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी उभा राहतील तेंव्हा तो हेतू साध्य होईल असे मला वाटते. संविधान स्तंभ देशाच्या व्यवस्थेची प्रतिकात्मक मांडणी आहे.
त्याच्या पायथ्याशी देशातील शेतकरी, मजूर, कामगार, कष्टकरी जनतेची मेहनत, मध्यभागी संवैधानिक संस्थांच्या विश्वासार्हतेची वाढणारी गती, विविध क्षेत्रातील आपण घेत असणारी गगनभरारी, सामाजीकदृष्ट्या वाढत असणारी बंधुत्वाची भावना तर अग्रभागी राजमुद्रेची प्रतिमा संविधानाचे सार्वभौमत्त्व स्पष्ट करणारी आहे. असा संदेश देणारी प्रतिके सार्वजनिक स्थळी उभारली जातात तेंव्हा त्यातून राष्ट्रीयत्व, समानता आणि बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन मिळते. यामुळेच संविधानस्तंभांची उभारणी ही लोकचळवळ होण्याची गरज आहे असे मला वाटते.
http://www.sarkarnama.in/constitution-pillar-erection-should-become-peoples-movement-28140