सध्या राज्यातील राजकारणात एक मुद्दा फार चर्चेत आहे, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? राष्ट्रवादी काँग्रेस: शरदचंद्र पवार पक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षासोबत जाव, असा एक मतप्रवाह पक्षात असल्याचं खुद्द शरद पवार यांनी सांगितलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं. त्याशिवाय पवार म्हणाले की, केंद्रात विरोधीपक्षात बसायचं की नाही, याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा. दोन्ही राष्ट्रवादी यांनी एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून ठरवावं, असंही ते म्हणाले. तसेच, विचारधारा एकच सल्याने भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही, असंही पवार म्हणाले. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.