By Editor on Friday, 31 March 2023
Category: पुणे शहर

[Sakal]राजीव गांधी प्राणी संग्रहालय तलावातील जलपर्णी धोकादायक

 कात्रज येथील स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील जलपर्णी झालेल्या तलावाची खासदार सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.गेल्या काही दिवसांपासून कात्रज व परिसरात वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावाचे प्रमुख कारण राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील कात्रज तलावात साठलेली जलपर्णी असून महापालिका प्रशसनाकडे या जलपर्णीबाबत कोणतेही उत्तर नाही. त्यामुळे याठिकाणी पहाणी करून जलपर्णीविषयी तातडीने उपाययोजना करून परिसरातील नागरिकांचे स्वास्थ्य आबाधित राखण्यासाठी सूचना सुळे यांनी केल्या.

मोठ्या प्रमाणात दूषित झालेल्या तलावातील पाण्याची पातळी कमी करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाविषयी काय उपाययोजना करता येतील याचाही अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपस्थित मलनिसाःरण विभाग प्रमुख येवलेकर यांनी एक महिन्याच्या आत तलावातील जलपर्णी काढण्याचे आश्वासन दिले.यावेळी सुळे यांनी तलावांमधून पूर्णपणे जलपर्णी काढण्यात येऊन सांडपाण्याची योग्य व्यवस्था लावण्यात येईल असे आश्वासन देत महापालिका आयुक्तांशी फोनवर चर्चा करून यासंदर्भात नाराजी दर्शवत सूचना केल्या.संग्रहालयात सुरू असलेली कामे, विस्कटलेली झाडे पाहून उद्यान विभागातील अधिकार्‍यांच्या कामांवर सुळे यांनी ताशेरे ओढले. पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यासाठी पर्यटन स्थळ असलेल्या उद्यानाची अवस्था तातडीने करावी अन्यथा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला वेगळा पवित्रा घ्यावा लागेल असाही सुळे यांनी इशारा दिला.माजी नगरसेवक प्रकाश कदम यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही काहीच उपाययोजना न झाल्याने कदम यांनी परिसरात स्वखर्चातून डास प्रतिबंधक औषध फवारणी करून घेतली तरीही प्रशासन जागे झाले नसल्याचे सांगितले.यावेळी माजी नगरसेवक युवराज बेलदरे, प्रगती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रतीक कदम यांनी उपाय सुचविले त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सुचना सुळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ही जलपर्णी काढण्याबाबत अनेक कंत्राटे महानगरपालिकेने काढली. मात्र, यावर कोणतीही ठोस उपाययोजना झाली नसल्याचे दिसून येते. मात्र आता या जलपर्णीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न झाला आहे. नागरिकांना श्वसनाचे तसेच डासांमुळे डेंगू मलेरिया आणि दुर्गंधी याचा त्रास रोज सहन करावा लागत आहे. यावेळी प्रकाश कदम, युवराज बेलदरे, प्रतिक कदम, संग्राहलयाचे संचालक राजकुमार जाधव उपस्थि होते.

MP Supriya Sule News: राजीव गांधी प्राणी संग्रहालय तलावातील जलपर्णी धोकादायक | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal

Leave Comments