गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गुंड नीलेश घायवळ हा चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. कोथरूडध्ये घायवळच्या टोळीतील दोघांनी केलेल्या गोळीबारानंतर घायवळच्या अडचणी वाढल्या. मात्र पोलीस घायवळपर्यंत पोहोचण्याआधीच तो परदेशात असल्याची माहिती समोर आली. पासपोर्टवर नावामध्ये बदल करून त्याने व्यवस्थेला चकवा देत पलायन केले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही काहींनी प्रश्न उपस्थित केले. तर दुसरीकडे घायवळवरून महायुतीमधी नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घायवळ पसार होण्यामागे अदृश्य शक्तीचा हात असल्याचं म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "शेतकरी, लाडक्या बहिणींच्या अर्जामध्ये थोडीशी चूक झाली, तरी ते त्वरित बंद केले जातात. परंतु, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मात्र लगेच पासपोर्ट मिळतो आणि परदेशात जाण्याची मुभा दिली जाते. हा कोणता न्याय आहे," असा सवाल त्यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले, "अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे दाखल असलेल्या नीलेश घायवळ याला पासपोर्ट मिळून तो देशाबाहेर पसार होण्यामागे अदृश्य शक्तीचा हात आहे."
सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्या म्हणाल्या, "कुख्यात आरोपी नीलेश घायवळ याला जलदगतीने पासपोर्ट दिला जातो. त्यातही गुन्हे दाखल असूनही पोलिसांकडून त्याला क्लीन चिट दिली जाते. हा प्रकार अतिशय गंभीर आहे." त्या पुढे म्हणाल्या, "आरोपी थेट विदेशात पळून गेल्याचे प्रकरण गंभीर असून, घायवळला पळून जाण्यास कोणी मदत केली याची चौकशी व्हायला पाहिजे. ती झाली नाही, तर संसदेत हा विषय उपस्थित केला जाईल." हा गंभीर प्रकार देशाच्या गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा अमली पदार्थांवर 'शून्य सहिष्णू' धोरण असल्याचे नेहमी सांगतात. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा सुळे यांनी व्यक्त केली.
Pune Crime : पुण्यातील कुख्यात गुंड निल्या घायवळचा विषय अमित शहांपर्यंत पोहोचणार, अदृश्य शक्ती कोण?