सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
बदलापूर शाळेतील लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलय. विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या प्रकरणानंतर मुंबईतील अनेक भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले अनेक बॅनर लावण्यात आलेत. त्यावर 'बदला पुरा' असं लिहिण्यात आलय. त्याचबरोबर या पोस्टरवर देवेंद्र फडणवीस यांच्या हातात बंदूक दाखवण्यात आलीय. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केलीय.
पुण्यात माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. "देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या हातात बंदूक असलेले पोस्टर लागणं हे माझ्यासारख्या महिलेसाठी खूप धक्कादायक आहे. जी लहान मुलं ते पोस्टर बघतील, त्यांच्यावर काय परिणाम होतील. राज्याचा गृहमंत्रीच बंदूक घेऊन फिरतोय. मिर्जापुर टीव्ही सिरीयलमध्येच अशा गोष्टी चालतात. हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा देश बंदुकीनं नाही तर संविधानानं चालणार" असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
"जिल्हा नियोजन समितीचा निधी आणि मंजूर कामांना जाणीवपूर्वक वगळण्यात आल्यानं आज पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. याबाबत विचारणा केली असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आम्ही सातत्यानं निधी मागत आहोत, मात्र आम्हाला निधी न देता काही सिलेक्टीव्ह लोकांना फक्त निधी दिला जात आहे. आम्ही आमच्या घराच्यांसाठी निधी मागत नाही, आम्ही रस्त्यांसाठी निधी, जनतेच्या कामासाठी आम्ही निधी मागत आहोत. मात्र आम्हाला निधी दिला जात नाही."