धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवनासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि नगरसेवक विशाल तांबे, बाळा धनकवडे, अश्विनी भागवत यांच्या प्रयत्नातून संविधान स्तंभ उभारण्यात आला आहे. याचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड, कुमार गोसावी, माजी महापौर दत्ता धनकवडे, प्रशांत जगताप, महापालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नाना देवकाते, रूपाली चाकणकर उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘गेल्या पन्नास वर्षांत भारताच्या भोवतालच्या देशात मोठी उलथापालथ झाली. त्या देशातील लोकशाही संपुष्टात आली. लष्करी राजवट आली, हुकूमशाही आली; परंतु खंडप्राय विशाल भारतात विविध जाती- धर्मांचे, विविध भाषांचे लोक असतानाही देश एकविचाराने भक्कम आणि एकसंध राहिला तो केवळ संविधानामुळे. संविधानातील आशय मार्गदर्शक तत्त्व म्हणून सर्वांनी स्वीकारल्यामुळेच देश आज समर्थपणे उभा आहे.’’ या वेळी संविधान पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. संविधान मूल्यांचा प्रसार आणि प्रचार करणारे सुभाष वारे, डॉ. अशोक शीलवंत, डॉ. प्रशांत पगारे यांचा सत्कार करण्यात आला.
सत्यमेव जयतेचा संदेश देणाऱ्या संविधानासंबंधीचे अज्ञान दूर करून संविधानातील सत्याचा संस्कार रुजवतानाच परिवर्तनासाठी सज्ज झाले पाहिजे.- डॉ. बाबा आढाव, कष्टकऱ्यांचे नेते
<"https://www.esakal.com/pune/country-will-not-forgive-those-who-attacked-constitution-says-sharad-pawar-157095">https://www.esakal.com/pune/country-will-not-forgive-those-who-attacked-constitution-says-sharad-pawar-157095