By Editor on Monday, 23 January 2023
Category: पुणे शहर

[Maharashtra Times]सुप्रिया सुळेंची ऐन गर्दीच्या वेळी कात्रज चौकाला भेट

महापालिका आयुक्तांना दिल्या 'या' सूचना

पुणे : कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाची तातडीने बैठक लावून समन्वय साधावा, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिल्या.

खासदार सुळे यांनी आज ऐन गर्दीच्या वेळीच सकाळी नऊ वाजता कात्रज चौकाला भेट देऊन येथील वाहतूक कोंडी आणि चालू कामांचा आढावा घेतला. कामांची पाहणी करत त्यांनी अधिकाऱ्यांना कामे त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश दिले. तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन काम करणाऱ्या सर्व संबंधित संस्थांची संयुक्त बैठक बोलावून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था काय करता येईल यावर चर्चा करावी, अशा सूचना दिल्या.

उड्डाणपूल व रस्त्याच्या कामांसह महावितरण, सर्व्हिस रोड, पाण्याची पाईपलाईन अशी सर्वच कामे एकत्रितपणे सुरु आहेत. परिणामी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. सर्वच प्रकारच्या वाहनधारक, पादचारी, रस्त्यालगतचे व्यावसायिक, दुकानदार तसेच स्थानिक नागरिकांनाही या कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या मध्येच उड्डाणपुलासाठीचे खांब उभे करण्याचे काम सुरू आहे. त्याचवेळी दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्ता आणि रुंदीकरणही चालू आहे. परिणामी वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला रस्ता अत्यंत अपुरा झाला आहे, इतकेच नाही, तर त्याची दशाही अत्यंत वाईट झाली आहे. परिणामी लहान मोठे अपघात देखील होत आहेत. ही गंभीर बाब आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.

या कामांबाबत शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय आणि पर्यायी उपाययोजनेचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कात्रज चाैकातील वीज, पाणी पाईप लाईन, पुलाचे काम आणि सेवा रस्ते या चार विषयांवर सविस्तर चर्चा झाली होती. त्यावेळी महापालिकेने ही कामे पूर्ण करण्यासाठी १ मे २०२३ ची डेडलाईन दिली होती. तथापि कामाची गती, आवाका आणि पद्धत पाहता ही तारीख गाठणे शक्य होईल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

आम्ही या कामाचा सातत्याने पाठपुरावा करत आहोत. परंतु महापालिका प्रशासनाचे अपेक्षित सहकार्य अद्यापही मिळत नसल्याने ही कामे संथगतीने सुरु आहेत, असे त्या म्हणाल्या. माजी सनदी अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर-हवेलीचे नेते संभाजीराव झेंडे, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, संतोष फरांदे यांच्यासह स्थानिक नागरीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांना निवडलं असताना देखील आज शिवसेना तोडण्याचं फोडण्याचं आणि त्रास देण्याचं जे काम होत आहे, ते म्हणजे तुम्ही बाळासाहेबांच्या निर्णयाला विरोध करत आहात. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

मी मनापासून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. ठाकरे आणि पवार कुटुंबीयांचे पाच दशकापासून ऋणानुबंधाचे संबंध आहेत. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जे काही राजकारण होत आहे, ते दुर्दैवी असून हे बाळासाहेबांना न आवडणारे आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या

Pune Katraj Chowk Traffic Supriya Sule, पुणे : सुप्रिया सुळेंची ऐन गर्दीच्या वेळी कात्रज चौकाला भेट; महापालिका आयुक्तांना दिल्या 'या' सूचना - mp supriya sule inspected the flyover at katraj chowk in pune - Maharashtra Times

Leave Comments