By Editor on Monday, 30 January 2023
Category: पुणे शहर

[Sarkarnama]दिव्यांगाच्या हक्कासाठी सुप्रिया सुळे रस्त्यावर

न्यायालयातही दाद मागणार

Supriya Sule News : दिव्यांगांना ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसून ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांकरीता काहीच मदत केली जात नाही.याबाबत केंद्र सरकारपर्यंत आवाज पोहचवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. "दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू," असे सुळे म्हणाल्या.

"दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आम्ही आज आंदोलन करावे लागत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. येत्या दोन दिवसांत याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठांच्या हक्कासाठी न्यायालयात दाद मागू, असा इशारा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केंद्र सरकारला दिला. त्यानंतरही मागणी पूर्ण झाली नाही, तर उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराघ्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जयदेव गायकवाड, कमल ढोले पाटील, प्रवक्ते प्रदीप देशमुख, पंकज साठे, हरिदास शिंदे, मुणालिनी वाणी, भारती शेवाळे, आनंद सवाने, रणजित शिवतरे, आलीम शेख, त्रिंबक मोकाशी, कैलास मकवान, संभाजी होळकर, संतोष रेणुसे, संतोष घोरपडे, महादेव कोंढरे, काकासाहेब चव्हाण, माणिकराव झेंडे, अप्पासाहेब पवार, भरत झांबरे, मनाली भिलारे, सुषमा सातपुते यांच्यासह पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, दिव्यांग बांधवही या आंदोलनात सहभागी झाले होते.

सुळे म्हणाल्या, "शिरूर आणि बारामतीला राष्ट्रवादीचे खासदार असल्यामुळे डावलण्यात येत आहे. वारंवार स्मरणपत्रे पाठवली, मंत्र्यांच्या भेटी घेऊन मागणी केली, इतकेच नाही, तर प्रत्यक्ष लोकसभेतही अनेक वेळा प्रश्न उपस्थित करून हा विषय आपण केंद्र सरकारच्या लक्षात आणून आहे. सातत्याने आपला पाठपुरावा चालू आहे, तरीही आजपर्यंत याबाबर निर्णय न झाल्याने आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे,"

दिव्यांगाच्या हक्कासाठी सुप्रिया सुळे रस्त्यावर ; न्यायालयातही दाद मागणार | MP Supriya Sule Agitation in front of pune collector office ADIP |Sarkarnama

Leave Comments